यंदाचा जून ठरला गेल्या 126 वर्षांतील सर्वात कोरडा महिना, सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पावसाची नोंद

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 30 जून या कालावधीत देशात सरासरी 165.3 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता.

  • Written By: Published:
Untitled Design (40)

Rainfall recorded at 40 percent below average : देशभरात यंदाचा जून महिना शतकातील सर्वाधिक कोरड्या जून महिन्यांपैकी एक ठरला आहे. मान्सूनच्या मंदावलेल्या वाटचालीमुळे देशातील बहुतांश भागांना पावसाच्या तीव्र तुटीचा सामना करावा लागला असून, जून 2026 हा 1901 नंतरचा पाचवा सर्वात कमी पाऊस नोंदवला गेलेला जून महिना ठरला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 30 जून या कालावधीत देशात सरासरी 165.3 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ 99.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे देशभरातील एकूण पावसाची तूट तब्बल 40 टक्क्यांवर पोहोचली आहे.

आयएमडीच्या आकडेवारीनुसार, यापूर्वी फक्त चार वेळाच जून महिन्यात यंदापेक्षा कमी पाऊस झाला होता. 2009 मध्ये 87.6 मिलिमीटर, 1905 मध्ये 91.9 मिलिमीटर, 2014 मध्ये 92.8 मिलिमीटर आणि 1926 मध्ये 96.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या विलंबाची तीव्रता अधोरेखित झाली आहे. या प्रदीर्घ कोरड्या कालखंडाचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होताना दिसत आहे. मातीत आवश्यक ओलावा नसल्याने अनेक राज्यांमध्ये खरीप पिकांच्या पेरण्या मंदावल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पेरणीचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

‘संध्याछाया’ ते ‘वाडा चिरेबंदी’… मराठी रंगभूमीला अजरामर कलाकृती देणाऱ्या विजया मेहता यांचे निधन

दुसरीकडे, मान्सूनच्या संथ प्रगतीमुळे जून महिन्याच्या बहुतांश काळात उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहिली. पावसाअभावी तापमानातही वाढ झाली आणि नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. पावसाच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका मध्य भारताला बसला आहे. या भागात सरासरी 170.3 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ 84.4 मिलिमीटर पाऊस झाला असून, तब्बल 50 टक्के तूट नोंदवली गेली आहे. तर वायव्य भारतातही 31 टक्के कमी पाऊस झाला आहे.

मात्र, जूनमधील या निराशाजनक परिस्थितीनंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 30 जूनपर्यंत मान्सूनने मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागांत पुढे वाटचाल केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दमण-दीव, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या आणखी काही भागांत पोहोचण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, जुलैच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकल्याने मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतात पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे जून महिन्यात निर्माण झालेली पावसाची मोठी तूट काही प्रमाणात भरून निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

follow us