FD वर आता ‘समान व्याज’चा नियम; RBI च्या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होणार?
Fixed Deposit New Rules FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून RBI चे नवे नियम लागू; प्रत्येक शाखेत मिळणार समान व्याजदर
Fixed Deposit New Rules : फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FD) गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी RBI ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून ठेवींवरील व्याजदरासंदर्भातील नवे नियम लागू होणार असून, त्यानंतर एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये समान रक्कम आणि समान मुदतीच्या FD वर वेगवेगळे व्याजदर देण्याची पद्धत पूर्णपणे बंद होणार आहे. याशिवाय, बँकांना त्यांच्या व्याजदरांची माहिती आधीच जाहीर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. RBI च्या नव्या निर्णयाचा नेमका तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? त्याबद्दल जाणून घेऊया…
आता प्रत्येक शाखेत समान FD वर समान व्याज
RBI च्या नव्या नियमानुसार, एखाद्या ग्राहकाने एकाच बँकेच्या कोणत्याही शाखेत एकाच दिवशी, समान रक्कम आणि समान कालावधीची FD केल्यास त्याला सर्व शाखांमध्ये समान व्याजदर मिळेल. म्हणजेच, केवळ शाखा बदलली म्हणून व्याजदर बदलणार नाही. ग्राहकांमध्ये कोणताही भेदभाव करता येणार नसल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे.
आर बीआई ने जमाराशि पर ब्याज दर संबंधी संशोधन निदेश जारी किए
RBI Issues Amendment Directions on Interest Rate on Depositshttps://t.co/dscyIvSWbz— ReserveBankOfIndia (@RBI) July 30, 2026
FD व्याजदर आधीच जाहीर करावे लागणार
ग्राहकांना संपूर्ण आणि पारदर्शक माहिती मिळावी यासाठी सर्व बँकांना त्यांच्या FD व्याजदरांची यादी अधिकृत वेबसाइटवर आगाऊ प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना FD करण्यापूर्वीच कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळणार, याची स्पष्ट माहिती मिळेल आणि विविध बँकांच्या ऑफर्सची तुलना करणेही सोपे होणार आहे.
कोणत्या बँकांना लागू असणाप नवे नियम?
RBI चे नवे नियम केवळ मोठ्या व्यावसायिक बँकांपुरते मर्यादित नसतील. तर, कमर्शियल बँका, स्मॉल फायनान्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लोकल एरिया बँका, पेमेंट बँका तसेच शहरी सहकारी बँकांसाठी लागू असतील.
बल्क FD साठीही नवे नियम
मोठ्या म्हणजेच बल्क डिपॉझिट संदर्भातही RBI ने महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत बँकांना त्यांच्या वेबसाइटवर बल्क FD चे व्याजदर अपडेट करावे लागतील. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनाही दररोजचे व्याजदर सहज उपलब्ध होणार आहेत.
NRI ठेवींसाठी बँकांना अधिक लवचिकता
रुपयांमधील NRI ठेवी आणि बल्क डिपॉझिटवरील व्याजदर ठरवताना बँकांना अधिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. लिक्विडिटीची गरज आणि निधी उभारणीचा खर्च लक्षात घेऊन बँका वेगवेगळे व्याजदर निश्चित करू शकतील.
1 ऑक्टोबरपासून FD चे व्याज वाढणार की कमी होणार?
RBI ने कोणत्याही बँकेला व्याजदर वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. 1 ऑक्टोबरपासून फक्त नियम बदलणार आहेत. व्याजदर आपोआप बदलणार नसून, पुढेही प्रत्येक बँक बाजारातील परिस्थिती, निधीची गरज आणि फंडिंग कॉस्ट लक्षात घेऊन FD चे व्याजदर निश्चित करेल.
FD गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?
RBI च्या या निर्णयामुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. जसे, एकाच बँकेच्या सर्व शाखांमध्ये समान FD वर समान व्याजदर मिळेल. व्याजदरांमध्ये अधिक पारदर्शकता येईल. FD करण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे सोपे होईल. शाखेनुसार वेगवेगळे व्याज मिळण्याचा गोंधळ संपुष्टात येईल. ग्राहकांना अधिक न्याय्य आणि समान वागणूक मिळेल.
ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय
RBI च्या या नव्या नियमांमुळे फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि ग्राहककेंद्रित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये व्याजदरातील तफावत संपुष्टात येणार असल्याने FD करणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांना याचा थेट फायदा होणार आहे.