बहुप्रतिक्षित ‘डेलॉइट इंडिया टॅलेंट आऊटलूक 2026 रिपोर्ट आला; यंदा किती टक्के वाढणार तुमचा पगार?
Salary Increment 2026 तुम्हीदेखील यावर्षीच्या पगारवाढीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.
Deloitte India Talent Outlook 2026 Report : तुम्हीदेखील यावर्षीच्या पगारवाढीची (Appraisal) वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ‘डेलॉइट इंडिया टॅलेंट आऊटलूक 2026’ च्या ताज्या रिपोर्टनुसार, 2026 मध्ये भारतातील सरासरी पगारवाढ 9.1% च्या आसपास स्थिर राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आता कंपन्या सरसकट पगारवाढ देण्याऐवजी ‘परफॉर्मन्स’ आणि ‘कौशल्यां’वर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचाही उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
‘डेलॉइट इंडिया टॅलेंट आऊटलूक 2026’ रिपोर्टनुसार, 2026 मध्ये भारतात सरासरी 9.1% पगारवाढ अपेक्षित आहे, जी 2025 मधील 9.0% च्या तुलनेत किंचित जास्त आहे. ही वाढ जरी किरकोळ वाटत असली, तरी ती पगार नियोजनातील एक संतुलित आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय दर्शवते. सध्या काही उद्योग क्षेत्रे फ्री हँड पगारवाढ देत आहेत, तर काही क्षेत्रे अत्यंत सावधगिरीने पावले उचलत आहेत. त्यामुळे, नोकरदारांनी केवळ आकडेवारीवर अवलंबून न राहता, आपली इंडस्ट्री आणि कंपनी सध्या कोणत्या स्थितीत आहे, हे समजून घेणे करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. Deloitte India Talent Outlook 2026 Report
डेलॉइट इंडियाचे पार्टनर आनंदोरूप घोष यांच्या मते, आता कंपन्या सरसकट पगारवाढ देण्याऐवजी कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी (Productivity) आणि कौशल्ये (Skills) यामधील गुंतवणुकीला जास्त महत्त्व देत आहेत. त्यामुळे आता केवळ कामाचा अनुभव असून चालणार नाही, तर नवीन कौशल्ये आत्मसात करणाऱ्या आणि कामाची क्षमता वाढवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कंपन्या गुंतवणुकीचा ‘स्मार्ट’ विचार करत आहेत.
कोणत्या क्षेत्रात होणार सर्वाधिक पगार वाढ?
रिपोर्टनुसार 2026 मधील पगारवाढीचे चित्र सर्वच क्षेत्रांसाठी एकसमान नसेल. यंदाच्या पगारवाढीच्या शर्यतीत ‘फार्मा आणि लाइफ सायन्सेस’ क्षेत्रात सर्वाधिक 10 % पगारवाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ मॅन्युफॅक्चरिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील विस्तार आणि नोकरभरतीची वाढती मागणी यामुळे पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे. याउलट, एकेकाळी पगारवाढीत अग्रस्थानी असलेले IT क्षेत्र सध्या सावध पवित्र्यात असून, टेक क्षेत्रातील प्रॉडक्ट आणि सर्व्हिस दोन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत पगारवाढीचा अंदाज 10 ते 70 बेसिस पॉईंट्सनी कमी केला आहे.
परफॉर्मन्स रेटिंगमध्ये घट, पण पदोन्नतीत वाढ
सध्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनासाठी अत्यंत कठोर ‘बेल कर्व्ह’ (Performance Bell Curve) धोरण अवलंबले आहे. त्यानुसार 2024 मध्ये 10 % कर्मचाऱ्यांना मिळणारे ‘टॉप रेटिंग’ आता केवळ 7% कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आले आहे, तर 16 % कर्मचारी सर्वात खालच्या श्रेणीत ढकलले गेले आहेत. पण, टॉप रेटिंगमध्ये जरी घट झाली असली तरी पदोन्नतीचा (Promotion) दर 12 % वरून 14 % पर्यंत वाढला आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्स आधारित कंपन्यांमध्ये हा कल अधिक दिसून येत आहे.
लेऑफचे प्रमाण स्थिर पातळीवर
सध्या नोकरभरतीचा वेग मंदावल्याने लेऑफचे प्रमाण एका स्थिर पातळीवर आले असून, 2024 मधील 17.4 टक्क्यांच्या तुलनेत 2025 मध्ये हा दर 17.6 टक्क्यांपर्यंत किंचित वाढला असला, तरी ही वाढ नवीन संधींमुळे नसून अंशतः कंपन्यांनी केलेल्या कर्मचारी कपातीमुळे असल्याचे दिसते. दुसरीकडे, टियर-2 आणि टियर-3 शहरांमधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे मनुष्यबळ आणि मजबूत होत असलेली ‘कॅम्पस भरती’ यामुळे कंपन्यांना आता नवीन आणि प्रतिभावान उमेदवार सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत कंपन्या पगारवाढीवर खर्च करण्यापेक्षा योग्य ‘टॅलेंट’ शोधण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत.