SBI ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक; तुमच्या पैशांना किती धोका? काळजी कशी घ्याल

SBI Customer Data Leak डार्क वेबवर आढळलेल्या नोंदींमध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक आणि बँकिंगशी संबंधित काही तपशीलांचा समावेश आहे.

  • Ninad K
  • Written By: Published:
SBI Customer Data Leak

SBI Customer Data Leak On Dark Web : तुमचं SBI मध्ये बँक खातं आहे? मग सावध व्हा, कारण तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख, ई-मेल आयडी आणि घराचा पत्ता चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला, तर त्याचा वापर तुमची फसवणूक करण्यासाठी होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 3,897 ग्राहकांच्या नोंदींमध्ये वैयक्तिक माहिती आढळल्याचं समोर आलं आहे. ही माहिती डार्क वेबवर उपलब्ध असल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर बँकेने तपास सुरू केला आहे. आता प्रश्न असा आहे की, या माहितीच्या आधारे सायबर भामटे तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात का? तुमची माहिती लीक झाली असेल, तर पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला हवं? जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण माहिती आणि ग्राहकांनी घ्यायची खबरदारी.

नेमकं काय घडलंय?

या प्रकरणाची सुरुवात 16 ऑक्टोबर 2026 रोजी झाली. SBI ला ग्राहकांच्या माहितीशी संबंधित संभाव्य डेटा लीकबाबत थ्रेट इंटेलिजन्स सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेकडून, डिफेन्स सायबर एजन्सीकडून आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक अर्थात CERT-In कडून अलर्ट मिळाला. त्यानंतर बँकेने डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या सुमारे 3.75 लाख नोंदींचं प्राथमिक विश्लेषण केलं. या तपासणीत 3,897 ग्राहकांच्या नोंदींमध्ये वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती असल्याचं आढळलं.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, डार्क वेब म्हणजे नेमकं काय? इंटरनेटचा असा भाग, जो सामान्य सर्च इंजिनवर सहज दिसत नाही, त्याला डार्क वेब म्हटलं जातं. या भागाचा वापर बेकायदेशीर व्यवहारांसाठीही केला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये चोरी केलेली किंवा अनधिकृतपणे मिळवलेली वैयक्तिक माहिती तिथे विक्रीसाठी ठेवली जाते किंवा इतरांपर्यंत पोहोचवली जाते. मात्र, SBI च्या प्रकरणात ही माहिती नेमकी कुठून आली, ती कितपत अचूक आहे आणि तिचा प्रत्यक्षात गैरवापर झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ग्राहकांची कोणती माहिती लीक झाली?

SBI च्या माहितीनुसार, डार्क वेबवर आढळलेल्या नोंदींमध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक आणि बँकिंगशी संबंधित काही तपशीलांचा समावेश आहे. यात ग्राहकाचं नाव, जन्मतारीख आणि लिंग. नोंदणीकृत मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि घराचा पत्ता. बँकेच्या शाखेचं नाव आणि ग्राहकाचा CIF क्रमांक. कर्ज आणि ग्राहकांच्या लीड रेकॉर्डशी संबंधित काही तपशील आदी गोष्टींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.  आता ही माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती गेली, तर त्यांना ग्राहकांची ओळख पटवणं आणि त्यांच्याशी संपर्क साधणं सोपं होऊ शकतं. विशेष म्हणजे, एखाद्या व्यक्तीची अनेक वैयक्तिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल, तर तिचा वापर करून अधिक विश्वासार्ह वाटणारे फसवणुकीचे फोन किंवा मेसेज केले जाऊ शकतात.

तुमच्या बँक खात्यातील पैसे चोरीला जाऊ शकतात का?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, डेटा लीक झाल्यामुळे तुमच्या खात्यातील पैसे धोक्यात आले आहेत का? तर, वैयक्तिक माहिती लीक झाली म्हणजे बँक खात्यातील पैसे चोरीला गेले, असा थेट अर्थ होत नाही. या प्रकरणात ग्राहकांच्या खात्यांमधून पैसे चोरीला गेल्याची माहिती समोर आलेली नाही. SBI नेही बँकेचे मुख्य व्यवहार, आर्थिक कामकाज आणि सेवा सुरळीत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, याचा अर्थ कोणताही धोका नाही, असंही म्हणता येणार नाही.

समजा, एखाद्या सायबर भामट्याकडे तुमचं नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि तुम्ही कोणत्या बँकेचे ग्राहक आहात, याची माहिती आहे. तो तुम्हाला फोन करून स्वतःची ओळख बँकेचा कर्मचारी असल्याची करून देऊ शकतो. त्यानंतर ‘तुमचं KYC अपडेट करायचं आहे’, ‘तुमचं खातं बंद होणार आहे’ किंवा ‘तुमच्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाला आहे’, अशी भीती दाखवू शकतो. तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर तो OTP, ATM PIN, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. काही वेळा बनावट लिंकवर क्लिक करायला लावूनही ग्राहकांची माहिती चोरली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीला फिशिंग किंवा सोशल इंजिनिअरिंग म्हटलं जातं. त्यामुळे तुमची माहिती लीक झाली आहे की नाही, हे माहीत नसतानाही अशा फसवणुकीपासून सावध राहणं आवश्यक आहे.

SBI ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

डेटा लीकची बातमी समजल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा काही गोष्टी कटाक्षाने पाळणं महत्त्वाचं आहे. यात  बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीलाही OTP, ATM PIN किंवा पासवर्ड देऊ नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. बँकेच्या अधिकृत माध्यमातून माहितीची खातरजमा करा. खाते सुरक्षित करण्यासाठी किंवा पडताळणीसाठी पैसे पाठवायला सांगितले, तर सावध व्हा. अनोळखी व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. बँकेच्या नावाने आलेल्या फोनवर लगेच विश्वास ठेवू नका.

डेटा लीक कसा झाला? SBI कडून तपास सुरू

ग्राहकांच्या माहितीशी संबंधित हा प्रकार समोर आल्यानंतर SBI ने सायबर घटनेला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सक्रिय केल्या आहेत. माहितीची सत्यता, तिचा संभाव्य स्रोत, डेटा किती प्रमाणात उघड झाला आणि ग्राहकांना कोणते धोके संभवतात, याचा तपास करण्यासाठी CERT-In च्या अधिकृत पॅनेलवरील स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेने आपल्या मुख्य कामकाजावर या घटनेचा लक्षणीय परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ग्राहकांची माहिती नेमकी कुठून बाहेर पडली आणि तिचा गैरवापर होण्याची शक्यता किती आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

SBI ग्राहकांनी घाबरायचं की सावध राहायचं?

या प्रकरणात सध्या 3,897 ग्राहकांच्या नोंदींमध्ये वैयक्तिक माहिती आढळल्याचं समोर आलं आहे. याचा अर्थ SBI च्या सर्व ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे किंवा सर्वांची बँक खाती धोक्यात आली आहेत, असा होत नाही. तसंच, माहिती लीक झाल्यामुळे खात्यातील पैसे आपोआप चोरीला जात नाहीत. मात्र, वैयक्तिक माहितीचा वापर करून ग्राहकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, ही शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे बँकेच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद फोन, मेसेज आणि लिंकबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे. तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाला असेल किंवा आर्थिक फसवणूक झाली असेल, तर तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा. तक्रार करण्यास उशीर करू नका.

follow us