शरद पवार यांनी पत्रकार राजदीप सरदेसाई यांची माफी का मागितली होती?
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित एक जुना अनुभव सांगत पत्रकारांच्या अधिकारांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
Sharad Pawar seeks Rajdeep Sardesai’s apology : नॉर्वेच्या एका महिला पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या प्रश्नानंतर देशात पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित एक जुना अनुभव सांगत पत्रकारांच्या अधिकारांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
राजदीप सरदेसाई यांनी एका कार्यक्रमात बोलताना १९९२ सालचा प्रसंग सांगितला. त्या वेळी शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री होते. एका पत्रकार परिषदेदरम्यान सरदेसाई यांनी पवारांना एक कठोर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला. त्या प्रश्नामुळे वातावरण तणावपूर्ण झालं आणि त्यांना थेट पत्रकार परिषदेतून बाहेर काढण्यात आलं. त्या घटनेनंतर आपल्याला मोठा धक्का बसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मात्र, या घटनेनंतर काही वेळातच शरद पवार यांनी स्वतः फोन करून “तुम्हाला बाहेर काढणं चुकीचं होतं असं सांगत दिलगिरी व्यक्त केली, असा खुलासा राजदीप सरदेसाई यांनी केला. सत्तेच्या सर्वोच्च पदावर असलेला नेता पत्रकाराशी मतभेद असतानाही संवाद साधतो, चूक मान्य करतो आणि माफी मागतो, ही त्या काळातील राजकीय संस्कृती होती, असं त्यांनी सांगितलं.
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुढच्या काही तासांत मोठी घडामोड? मार्को रुबियो यांच्या विधानाने युद्ध थांबण्याच्या चर्चांना वेग
याच उदाहरणाचा दाखला देत राजदीप सरदेसाई यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर अप्रत्यक्ष टीका केली. पत्रकारांनी प्रश्न विचारायचे नाहीत का? लोकशाहीत सत्तेला प्रश्न विचारणं ही माध्यमांची जबाबदारी आहे. मात्र आता कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांकडे संशयाने पाहिलं जातं, असं ते म्हणाले. त्यांनी पुढे असंही नमूद केलं की, पूर्वी राजकारणी आणि पत्रकार यांच्यात मतभेद असले तरी संवादाचे दरवाजे बंद होत नसत. पत्रकार परिषदांमध्ये कठोर प्रश्न विचारले जात, वाद होत; पण त्यातून लोकशाही अधिक मजबूत होत असे. आता मात्र अनेकदा पत्रकार परिषदांमध्ये निवडक प्रश्न घेतले जातात किंवा कठीण प्रश्न टाळले जातात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नॉर्वेच्या महिला पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या प्रश्नानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी पत्रकाराच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी त्या प्रश्नावर आक्षेप घेतला. मात्र या संपूर्ण वादातून पुन्हा एकदा सत्तेला प्रश्न विचारण्याचा पत्रकारांचा अधिकार हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. राजदीप सरदेसाई यांनी सांगितलेल्या शरद पवारांच्या उदाहरणामुळे सध्याच्या राजकीय संस्कृतीची तुलना जुन्या काळाशी केली जात आहे. पत्रकारितेचं स्वातंत्र्य, सत्ताधाऱ्यांची सहनशीलता आणि लोकशाहीतील संवादाची परंपरा यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, हा मुद्दा आगामी काळातही राजकीय आणि माध्यम क्षेत्रात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.