फुटबॉलचा FIFA, क्रिकेटची ICC अन् भारताची BCCI… क्रीडाविश्वात कमाईचा ‘King’ कोण?

क्रीडाविश्वात पैसा कसा कमावला जातो? फुटबॉल विश्वचषकातून फिफा किती कमावते? क्रिकेट विश्वचषकातून आयसीसी किती कमावते?

  • Written By: Published:
FIFA BCCI ICC

FIFA BCCI Or ICC Who Earns More :  क्रीडाविश्वात पैसा कसा कमावला जातो? फुटबॉल विश्वचषकातून फिफा किती कमावते? क्रिकेट विश्वचषकातून आयसीसी किती कमावते? एवढेच नव्हे तर, वेगवेगळ्या देशांसोबत मालिका खेळून किंवा आयपीएलमधून बीसीसीआय किती कमावते? हे असे प्रश्न आहेत जे केवळ क्रीडा चाहत्यांच्याच नव्हे, तर सामान्य लोकांच्या मनातही निर्माण होऊ शकतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पण त्याआधी, चला या तिघांचा इतिहास जाणून घेऊया….

FIFA v/s ICC v/s BCCI इतिहास काय?

FIFA : सगळ्या पहिले तर, सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या फिफाबद्दल जाणून घेऊया. फिफाची स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली. फिफाचं पूर्ण नाव फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन असे आहे. याची स्थापना सात युरोपीय देशांनी मिळून केली असून, फिफाने 1930 मध्ये पहिल्या विश्वचषकाचे आयोजन केले. आज 200 हून अधिक देश फिफाचे सदस्य आहेत.

ICC : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणाऱ्या आयसीसीची स्थापना 15 जून 1909 रोजी झाली. सुरुवातीला यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता, त्यामुळेच याचे नाव ‘इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ असे होते. 1987 मध्ये याचे नाव बदलून ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद’ असे ठेवण्यात आले. पहिला विश्वचषक 1975 मध्ये आयोजित करण्यात आला होता. आज ICC चे 110 देश सदस्य आहेत.

BCCI : 1 डिसेंबर 1928 मध्ये मद्रास म्हणजेच आताचे चेन्नई येथे स्थापना झाली. याचे पूर्ण नाव ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ असे आहे. 1936 मध्ये भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. 1934 मध्ये बीसीसीआयने पहिल्या रणजी ट्रॉफीचे आयोजन केले. आज BCCI जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे.

आता आपण तिघांच्याही कमाईबद्दल बोलूया…

तर, फिफा दर चार वर्षांनी फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते, ज्यामुळे पुढील चार वर्षांसाठी महसूल मिळतो. 2022 मध्ये जेव्हा कतारमध्ये विश्वचषक स्पर्धा झाली, तेव्हा फिफाने 7.57 अब्ज डॉलर्स (70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमावले. फिफाच्या आर्थिक अहवालानुसार, 2025 मध्ये संस्थेचा महसूल 2.66 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 25,236 कोटी रुपये होता. हा महसूल अपेक्षेपेक्षा 9 टक्के जास्त होता.

फिफाच्या महसुलाचा सर्वात मोठा स्रोत टीव्हीला देण्यात येणाऱ्या हक्कांमधून आहे. ज्यातून 2025 मध्ये 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. तर, दुसरा सर्वात मोठा स्रोत प्रायोजकत्व आहे, ज्यातून 96.5 कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे 9,155 कोटी रुपये उत्पन्न फिफाला मिळाले. याशिवाय स्पर्धेच्या तिकिटांची विक्री हादेखील महसुलाचा तिसरा सर्वात मोठा स्रोत आहे. 2025 मध्ये फिफाने तिकिटांच्या विक्रीतून 26 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली.

आता ICC च्या कमाईबद्दल जाणून घेऊया. क्रिकेटची जागतिक नियामक संस्था असलेल्या आयसीसीच्या महसुलात 2025 मध्ये किंचित घट झाली. आयसीसीच्या आर्थिक अहवालानुसार, संस्थेने 2025 मध्ये 75.6 कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे 7,175 कोटी रुपये कमावले. 2024 च्या तुलनेत ही 2.6 टक्के घट होती. 2024 मध्ये आयसीसीचा महसूल 77.6 दशलक्ष डॉलर्स होता.

आयसीसीचा महसूल विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धांमधून आहे. पण, 2025 मध्ये ICC ला इवेंट्समधून होणारा रेवहेन्यू 3 टक्क्यांनी घटून 70 कोटी डॉलर झाला होता. जो 2024 मध्ये 72 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होता. आयसीसीने 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, महिला क्रिकेट विश्वचषक आणि 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक यांचे आयोजन केले. पाकिस्तानमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे आयसीसीला 63 कोटी डॉलर्सचा महसूल मिळाला.

आयसीसी आपला बहुतांश महसूल मीडिया हक्कांमधून मिळवते. यातील सुमारे 75 टक्के मीडिया हक्क भारताकडे आहेत. आयसीसीने 2024 ते 2027 या कालावधीसाठी जिओस्टार इंडियासोबत 3 अरब डॉलर्सचा करार केला आहे. याव्यतिरिक्त, यूकेमधील स्काय स्पोर्ट्स, ऑस्ट्रेलियामधील प्राइम व्हिडिओ, दक्षिण आफ्रिकेतील सुपर स्पोर्ट आणि अमेरिका व कॅनडामधील विलो टीव्ही यांचाही यात सहभाग आहे.

ICC पेक्षा ज्या बोर्डाची चर्चा जगभरात सर्वाधिक होते ती म्हणजे BCCI ची. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयच्या वार्षिक अहवालानुसार, 2024-25 मध्ये 11,055 कोटी रुपयांचा महसूल कमावला जो 2023-24 च्या तुलनेत 13 टक्के अधिक होता. बीसीसीआयला आयपीएलमधून सर्वाधिक महसूल मिळतो. पण,, 2024-25 मध्ये आयपीएलमधून मिळणाऱ्या महसुलात 12 टक्के घट झाली. 2024-25 मध्ये बीसीसीआयने आयपीएलमधून 5,070 कोटी कमावले, तर 2023-24 मध्ये हा आकडा 5,761 कोटी होता.

यानंतर, बीसीसीआयला आयसीसीकडून 3,065 कोटी मिळाले होते. मीडिया हक्कांमधून 2024-25 मध्ये बीसीसीआयने 813 कोटी कमावले. तसेच वूमेन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून BCCI ने 391 कोटींची कमाई केली. तर, पुरुष संघाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमधून आणि स्पर्धांमधून BCCI ला 322 कोटी मिळाले. याशिवाय, बीसीसीआयने केवळ व्याजातून 1,368 कोटी कमावले.

FIFA, ICC अन् BCCI यापैकी कमाईत सर्वात मोठा किंग कोण?

आता FIFA, ICC आणि BCCI च्या कमाईचे आकडे बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तिघांचीही कमाई कोट्यवधींमध्ये आहे मग सर्वात श्रीमंत कोण? तर, महसूल आणि रिच या दोन्ही बाबतीत फिफा सर्वात मोठा असून, जगभरात 5 अब्ज लोक विश्वचषक पाहतात असा अंदाज आहे.
फिफाने 2023 ते 2027 या काळात 13 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1.23 लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होईल असा अंदाज बांधला आहे.

यापैकी, केवळ 2026 मध्येच 9 अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. विश्वचषक ट्रॉफीची किंमत 7.13 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 67.5 दशलक्ष रुपये आहे. तर, विजेत्या संघाला 5 कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे 475 कोटी रुपये मिळणार आहेत. एकूण काय तर, क्रिकेटचे जग फुटबॉलपेक्षा लहान आहे. क्रिकेटमध्ये पैसा गुंतवणारे मोजकेच देश आहेत आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक सर्वात मोठा आहे. क्रिकेट जगताच्या एकूण महसुलापैकी 70 टक्के महसूल एकट्या भारतातून येतो.

follow us