श्रीराम ग्रुपच्या आर त्यागराजन यांनी केलं 6 हजार 210 कोटींचं दान, स्वत:साठी ठेवलं फक्त एक छोट घर
R Thyagarajan : संपत्तीवरून अनेकदा भावा-भावात, कुटूंबात वाद होत असतात. काही वेळा तर संपत्तीवरून झालेले वाद जीवावरही बेततात. मात्र, जगात असे काही लोक आहेत जे आपली सर्व संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना वाटून देतात आणि आरामात घरी बसतात. असचं एक नाव आहे आर त्यागराजन. श्रीराम ग्रुपचे संस्थापक असलेले आर त्यागराजन ( R.Thyagarajan) यांनी त्यांचे छोटे घर आणि कार वगळता सर्व संपत्ती दान केली आहे. एका मुलाखतीत 86 वर्षीय त्यागराजन यांनी सांगितले की, मी 750 मिलियन डॉलर (सुमारे 6210 कोटी रुपये) दान केले आहेत. (shriram group founder r thyagarajan donated 6 thousand crores property)
आपली कोटी रुपयांची ही संपत्ती कधी दान केली, हे त्यांनी सांगितले नाही. त्यागराजन यांनी आपला संपूर्ण संपत्तीचा एक मोठा हिस्सा आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. त्यांनी सर्व पैसे श्री राम ओनरशिप ट्रस्टकडे हस्तांतरित केले.
श्रीराम ग्रुपची स्थापना 1974 मध्ये झाली
श्रीराम ग्रुपची स्थापना 5 एप्रिल 1974 रोजी आर त्यागराजन, एव्हीएस राजा आणि टी. जयारमन यांनी चेन्नई येथे केली होती. समूहाची सुरुवात चिटफंड व्यवसायाने झाली आणि नंतर समूहाने कर्ज आणि विमा व्यवसायात प्रवेश केला. ज्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही अशा कमी उत्पन्न असलेल्यांना कर्ज देऊन त्यागराजन यांनी आपले साम्राज्य उभे केले आहे.
या ग्रुपमध्ये 1,08,000 लोक काम करतात
श्रीराम ग्रुपमध्ये 1,08,000 लोक आजमितीला काम करतात. त्यांची कंपनी समाजातील गरीब घटकांना ट्रक, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहे. त्यागराजन यांनी मुलाखतीत सांगितले की क्रेडिट इतिहास नसलेल्या लोकांना कर्ज देणे धोकादायक नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कंपनी सुरू केली. प्रमुख कंपनी श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजार मूल्य सुमारे 8.5 बिलियन डॉलर आहे. जून तिमाहीत त्याचा नफा सुमारे 200 मिलियन डॉलर इतका होता.
गरिबांना कर्ज देणे हा समाजवादाचा प्रकार
आर त्यागराजन म्हणाले की, मी थोडा वामपंथी आहे, पण जे लोक अडचणीत आहेत, आर्थिक विवंचनेत आहेत, त्यांच्या अडचणी कमी करायच्या आहेत. यासोबतच त्यागराजन म्हणाले की, क्रेडिट हिस्ट्री आणि नियमित उत्पन्न नसलेल्या लोकांना कर्ज देणे हे जितके मानले जाते तितके धोकादायक नाही हे सिद्ध करण्यासाठी मी या व्यवसायात आलो. आर त्यागराजन म्हणाले की, गरिबांना कर्ज देणे हा समाजवादाचा एक प्रकार आहे. आम्ही लोकांना परवडणाऱ्या दरात कर्ज देण्याचा प्रयत्न केला आहे.
तामिळनाडूच्या शेतकरी कुटुंबात जन्म
आर त्यागराजन यांचा जन्म तामिळनाडूमधील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी गणितात पदवी संपादन केली आणि पुढं कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1961 मध्ये ते न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत रुजू झाले. त्यांनी दोन दशके अनेक वित्त कंपन्यांमध्ये कर्मचारी म्हणून काम केले. त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी आपला स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि आता समूहाच्या 30 कंपन्या आहेत. त्यागराजन यांच्याकडे मोबाईल नाही कारण त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते असे त्यांचे मत आहे. ते एका छोट्या घरात राहतात.