माझं अन् सोनमचं नातं संपलं; मी तिच्याविरोधात लढणार, सोनमच्या भावाचा राजाच्या कुटुंबाला शब्द

Raja Raghuvanshi Murder Case : इंदूरमधील राजा रघुवंशी याच्या मेघालयमधील शिलॉन्ग येथे झालेल्या हत्या प्रकरणाची देशभर चर्चा होत आहे. राजाची पत्नी सोनम हीच या हत्या (Murder) प्रकरणातील प्रमुख आरोपी असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलीस आज तिला न्यायालयात हजर करणार आहेत. दरम्यान, सोनमच्या कुटुंबियांनी आज राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.
सोनमचा भाऊ गोविंद याने राजाच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी स्वतः या हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करेन असं तो म्हणाला आहे. त्याचबरोबर, सोनमचं राज कुशवाहबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या बातम्या गोविंदने फेटाळल्या आहेत. सोनमने तिचा प्रियकर (राज कुशवाह) व भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने तिचा पती राजा रघुवंशी याला ठार केल्याचं प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितलं आहे.
इंदौरच्या राजा खून प्रकरणात नवा ट्वीस्ट; पत्नी सोनमने दिली ही धक्कादायक माहिती
राज कुशवाह हा आमच्या कंपनीत कर्मचारी होता. त्याचं आणि सोनमचं प्रेमप्रकरण नव्हतं. सोनम त्याला भाऊ मानायची, राजही तिला दिदी म्हणायचा. सोनम त्याला राखी बांधायची. या प्रकरणात आमच्याकडून जी काही मदत होऊ शकते ती सर्व प्रकारची मदत आम्ही करू असंही सोनमचा भाऊ म्हणाला आहे. मी सोनमविरोधात सर्व काही आवश्यक कारवाई करेन. कारण राजा हा माझा खूप जवळचा मित्र होता. सोनम या प्रकरणात दोषी असेल तर मी तिच्या फाशीच्या शिक्षेची तजवीज करेन असंही तो म्हणाला आहे.
सोनम असं काहीतरी करणार असल्याची मला थोडी जरी कुणकुण लागली असती तरी मी राजाला वाचवलं असतं. राजा हा आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच होता. मी स्वतः राजासाठी न्यायालयात वकील उभा करणार आहे. मी सोनमविरोधात लढणार आहे. माझं आणि सोनमचं नातं आता संपुष्टात आलं आहे असंही त्याने स्पष्ट केलं.