संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधींचे PM मोदींना खरमरीत पत्र; नऊ मुद्द्यांवरून घेरलं
नवी दिल्ली : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. पाठवलेल्या खरमरीत पत्रात सोनिया गांधींनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चौकशीची मागणी केली आहे. सरकारने कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन बोलावल्याबद्दल सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त करत अधिवेशनाचा अजेंडा न सांगण्यावर आक्षेप घेत नऊ मागण्या ठेवल्या आहेत. (Sonia Gandhi letter to PM Modi)
Here is the letter from CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji to PM Modi, addressing the issues that the party wishes to discuss in the upcoming special parliamentary session. pic.twitter.com/gFZnO9eISb
— Congress (@INCIndia) September 6, 2023
सोनिया गांधींच्या पत्रात काय?
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात एकूण 9 मुद्दे उपस्थित केले आहे. यात आर्थिक परिस्थिती, महागाई, बेरोजगारी या विषयांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे आणि एमएसपीच्या हमीभावाचे आजपर्यंत काय झाले? यावरही भाष्य करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय सोनिया गांधी यांनी अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी करत जात जनगणना तातडीने करण्याचे आवाहन केले आहे. वरील मुद्द्यांसह सोनिया गांधींनी पत्रात केंद्राने फेडरल संरचना, राज्य सरकारे आणि हिमाचल प्रदेशातील आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. याशिवाय देशातील जातीय तणाव, मणिपूर हिंसाचार आणि लडाखमध्ये चीनची घुसखोरी हे मुद्द्यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे.
पाच दिवस संसदेचे विशेष अधिवेशन
मोदी सरकारने येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशन काळात अनेक विधेयके आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात प्रामुख्याने वन नेशन वन इलेक्शन आणि इंडियाचे नाव बदलण्याचे विधेयक आणले जाऊ शकते. या दोन्ही गोष्टींवरून विरोधकांकडून मोठा विरोध दर्शवला जात आहे. मात्र, अद्यापर्यंत सरकारकडून नेमके हे अधिवेशन का बोलावण्यात आले आहे यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.