वाराणसीत संतापजनक प्रकार; नर्सरीतील चिमुकल्याच्या गुप्तांगाला शिक्षिकेकडून चटके, गुन्हा दाखल
पालकांनी संबंधित शिक्षिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे शिक्षक-विद्यार्थी (Varanasi) नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्सरीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थ्याने पँटमध्ये लघवी केल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने त्याच्या गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याने वर्ग सुरू असताना लघवीला जाण्याची परवानगी शिक्षिकेकडे मागितली होती. मात्र, त्याला परवानगी नाकारण्यात आल्याने अखेर त्याने वर्गातच पँटमध्ये लघवी केली. या प्रकारामुळे संतापलेल्या शिक्षिकेने अमानुष वागणूक देत गॅसवर चाकू गरम करून विद्यार्थ्याच्या गुप्तांगाला चटके दिल्याचा आरोप आहे.
रोहित पवारांनी पेपरफुटीचा बॉम्ब फोडताच एक तासांत MPSC कडून दखल;नेमकं काय घडलं?
घरी परतल्यानंतर चिमुकल्याने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता सिंह यांची भेट घेतली. मात्र, योग्य सहकार्य मिळण्याऐवजी धमकी देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी, २५ जुलै रोजी, पीडित विद्यार्थ्याचे वडील पुन्हा शाळेत गेले असता मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापनाने मदत करण्यास नकार दिल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे मुलाला शारीरिक तसेच मानसिक धक्का बसल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अखेर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी लालपूर-पांडेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिला शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.