ऐतिहासिक! भारताची ‘दक्षिण’ दिग्विजय मोहिम फत्ते; चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग
Chandrayaan-3 : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्त्रोच्या चांद्रयान -3 चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं आहे. आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने दिली आहे. या सॉफ्ट लँडिंगने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. आता पुढील चार तासांनंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येणार असून त्यानंतर पुढचे 14 दिवस चंद्रावरील संशोधनाचे कार्य केले जाणार आहे. (Successful soft landing of ISRO’s Chandrayaan-3 on the Moon)
Indian Space Research Organisation’s (ISRO) third lunar mission Chandrayaan-3 makes soft-landing on the moon pic.twitter.com/pnX7WcQhr0
— ANI (@ANI) August 23, 2023
चांद्रयान -3 लॅंडिंग झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्गमधून इस्त्रोच्या टीमचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, आज चंद्रावर चांद्रयान-3 लॅंडिंग झालं आहे, ही घटना ऐतिहासिक आहे, हा क्षण ऐतिहासिक असून अभूतपुर्व आहे, तसेच भारताच्या विकासाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, चंद्रयान-3 चंद्रावर लँडिंग होताच देशभरातून आनंदोस्तव साजरा केला जात आहे.
पीएम मोदी म्हणाले, आयुष्य धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा क्षण आहे. आज प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-3 च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. ते म्हणाले की शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे आपण दक्षिण ध्रुवावर पोहोचलो आहोत जिथे कोणीही पोहोचू शकले नाही. आज सर्व समज बदलतील. आपण पृथ्वी माता आणि चंद्राला मामा म्हणतो.
भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने उंचावली आहे. जनतेचा उर आनंदाने भरुन आला आहे. आज प्रत्येकजण इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत प्रत्येकजण एवढच म्हणत आहे की, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा. कारण भारताच्या चांद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. विशेष म्हणजे आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली आहे. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे.