Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला विषय; आता पुढे काय?
Rahul Gandhi Defamation Case : ‘मोदी’ आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेले अपील सूरत सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. मानहानीच्या खटल्यात मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधींनी आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी सुरत न्यायालयाच्या न्यायाधिशांनी फक्त ‘डिसमिस’ हा एकाच शब्दा उच्चारत राहुल गांधींचा विषय संपवला. यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता राहुल गांधींसमोर पुढचे पर्याय काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कर्नाटकातील एका सभेत राहुल गांधींनी मोदी आडनावावरून केलेल्या टीकेवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात राहुल यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षादेखील सुनावली आहे. त्यानंतर निकालानंतर 24 तासांच्या आत राहुल गांधी यांची खासदारकीदेखील रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राहुल गांधींसमोर आता अहमदाबाद उच्च न्यायालयात जाणे हा एकमेव पर्याय उरला आहे.
सत्र न्यायालयाचा धक्का, राहुल गांधींकडे आता काय पर्याय ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अपील सत्र न्यायालयाने फेटाळले असले तरी त्यांच्याकडे अनेक मार्ग मोकळे आहेत. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही, तर राहुल यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. दरम्यान, उद्या 21 एप्रिल रोजी राहुल गांधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, लवकर सुनावणीची मागणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कशामुळे आले अडचणीत?
2019 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत ‘मोदी’ आडनाव असलेल्यांना काही प्रश्न विचारले होते. भारतातील ‘फरारी’ नीरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करून त्यांनी विचारले होते की, ‘ सर्व चोरांची नावे मोदीच का?’ असतात अशी टिपप्णी केली होती. त्यानंतर गुजरातचे भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर निकाल देताना सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.