धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार, अभिजित दीपक यांच्या अजून 2 मोठ्या मागण्या
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.
The agitation will continue : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलनस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना संबोधित करत पुढील लढ्याची दिशा स्पष्ट केली.
आपण करून दाखवलं…
जंतर-मंतरवर उपस्थित हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिजीत दीपके म्हणाले, आपण सर्वांनी मिळून हे करून दाखवलं. वारंवार सांगितलं जायचं की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. पण देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीने आणि संघर्षाने ते शक्य करून दाखवलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलनस्थळी घोषणाबाजी आणि जल्लोष पाहायला मिळाला. आंदोलन संपलेले नाही; आणखी मागण्या प्रलंबित. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करतानाच दीपके यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाचा उद्देश केवळ राजीनामा मिळवणे नव्हता. विद्यार्थ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची मागणी
दीपके यांनी सरकारकडे मागणी केली की, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून निघू शकत नसले, तरी सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या कुटुंबांना आधार द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा
लाठीचार्ज प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख करत दीपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, आंदोलन दडपण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आदेश देण्यात आले होते. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, 20 जुलैनंतर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही दीपके यांनी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही होऊ नये, असे ते म्हणाले.
राजीनाम्यापूर्वी काय घडले होते?
सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. विविध राज्यांतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच कला, शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही आंदोलनाला समर्थन दिले होते. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना केंद्र सरकारकडून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची भेट घेतली होती. तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींशीही चर्चा करण्यात आली होती.
ब्रेकिंग : विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश; अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
सरकारने आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, तसेच दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे संकेत दिले होते. याशिवाय, नीट पेपरफुटी प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी घोषणाही करण्यात आली होती. या आश्वासनांनंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण मागे घेतले.
मात्र, कॉकरोच जनता पार्टीने आपली भूमिका बदलली नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार सीजेपीने व्यक्त केला होता. अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाने पहिला टप्पा गाठल्याचे सांगितले जात असले, तरी उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.