Mizoram Election : मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख पुढं ढकलली, आता ‘या’ दिवशी मतमोजणी
Mizoram Election 2023 : पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकानंतर संपूर्ण देश ३ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) मिझोराममधील मतमोजणी एका दिवसासाठी पुढे ढकलली आहे. यासंदर्भात आयोगाने नवी तारीख जाहीर केली आहे. आता राज्यातील मतमोजणी रविवार (3 डिसेंबर) ऐवजी 4 डिसेंबरला होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
‘पक्षाची घटना योग्य की अयोग्य? EC चं ठरवणार’; सुनावणीनंतर असीम सरोदेंनी सांगितलं
निकालाची तारीख बदलण्याची मागणी
निवडणुका जाहीर झाल्यापासून मिझोराममध्ये निकालाची तारीख बदलण्याची मागणी होत आहे. यासाठी सर्व पक्षांमध्ये एकमत होते. रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस असल्याचा दावा या पक्षांनी केला. त्यामुळे ख्रिश्चनबहुल मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलण्यात आली. या मागणीबाबत सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. या पत्रावर सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
…म्हणून अनिल देशमुखांचं मंत्रिमंडळातून नाव वगळलं; अजितदादांनी सांगितलं खरं
शुक्रवारी निदर्शने
मिझोराम एनजीओ कोऑर्डिनेशन कमिटी (NGOCC) च्या सदस्यांनी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्तावित मतमोजणीच्या तारखेत बदल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर निदर्शने केल्याची माहिती आहे. NGOCC हा प्रभावशाली सेंट्रल यंग मिझो असोसिएशन (CYMA) आणि मिझो जिरलाई पावल (MZP) सह प्रमुख नागरी समाज संस्था आणि विद्यार्थी संघटनांचा एक समूह आहे.
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक झाल्याची माहिती आहे. या कालावधीत राज्यातील 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. राज्य निवडणूक आयोग मतमोजणीसाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे.
मतमोजणीसाठी सुरक्षा दल तैनात
पोलिस महासंचालक (डीजीपी) अनिल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), IRBN आणि मिझोराम सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ईव्हीएम सर्व जिल्हा मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहेत.