US-China Tariff War : ड्रॅगनचा महाशक्तीवर काऊंटर फायर; कोळसा-LNG वर लावले 15 टक्के टॅरिफ
US-China Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांन चिनने मोठा धक्का दिला आहे. मंगळवारपासून चिनी वस्तूंवर 10% यूएस टॅरिफ लागू होताच, चीनने ताबडतोब प्रत्युत्तर दिले आणि काही अमेरिकन उत्पादनांवर 10% ते 15% शुल्क लागू करण्याची घोषणा केली. (Donald Trump) चीनने म्हटले आहे की 10 फेब्रुवारीपासून ते यूएस कोळसा आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूवर अतिरिक्त 15% शुल्क लागू करेल आणि कच्चे तेल, कृषी यंत्रसामग्री, मोठ्या विस्थापन मोटारी आणि पिकअप ट्रकवर 10% शुल्क लागू करेल.
मेक्सिको अन् कॅनडाला दिलासा.. टॅरिफचा निर्णय थांबला; ट्रम्प यांनी घेतली माघार
चीनच्या मंत्रिमंडळाच्या राज्य परिषदेच्या सीमा शुल्क आयोगाने एका निवेदनात म्हटलं आहे की, अमेरिकेने केलेली ही एकतर्फी दरवाढ जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे गंभीरपणे उल्लंघन करते आणि सामान्य चीन-अमेरिकेचे आर्थिक आणि व्यापार संबंध कमजोर करत आहे.
अगोदर अमेरिकेने घेतला होता निर्णय
या निर्णयामुळे अमेरिका आणि या देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले असून, भविष्यात इतर देशांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या मालावर 25% अतिरिक्त शुल्क लावला आहे. तर, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के शुल्क वाढवण्यात आला आहे. मात्र, कॅनडातून आयात होणाऱ्या तेलावर केवळ 10 टक्के शुल्क असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या करांच्या पहिल्या सेटमध्ये भारताचे नाव नाही.
व्यापार तुटीत चीनचा मोठा वाटा
ट्रम्प सरकार लवकरच कॉम्प्युटर चिप्स, फार्मास्युटिकल्स, स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, तेल आणि वायूच्या आयातीवर नवीन शुल्क लावण्याचा विचार करत आहे. युरोपीय देशांवरही असेच शुल्क आकारले जाऊ शकते. व्यापार तुटीमुळे अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम (RIS) नुसार, चीन, मेक्सिको आणि कॅनडा हे अमेरिकेच्या व्यापार तुटीत सर्वात मोठे योगदान देणारे आहेत. चीनचे योगदान 30.2 टक्के, मेक्सिकोचे 19 टक्के आणि कॅनडाचे 14 टक्के आहे, तर भारत या यादीत 9व्या क्रमांकावर आहे.
चीनने तीव्र निषेध नोंदवला
चिनी वस्तूंवर कर लादण्याच्या अमेरिकन आदेशाचा चीनने तीव्र निषेध नोंदवला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, ते जागतिक व्यापार संघटनेत खटला दाखल करणार असून, आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणार आहेत. अमेरिकेने एकतर्फी शुल्क वाढ करणे हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे चीनी मंत्रालयाने म्हटले आहे .
कॅनडाचाही तीव्र विरोध
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफच्या विरोधात बदला म्हणून अनेक अमेरिकन आयातीवर 25% शुल्क लावेल. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे त्यांनाही गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. तर, मेक्सिकन अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनीदेखील अमेरिकन आयातीवर शुल्क लादण्याचा इशारा दिला.
BREAKING: China to impose 10% tariff on U.S. Oil; 15% tariff on coals and LNG – Bloomberg
— BNO News (@BNONews) February 4, 2025