Donald Trump : मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि.. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॉडेलचा गंभीर आरोप
US Presidential Election 2024 : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांचं वार वाहतं आहे. येथे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदार पुन्हा संधी देणार की भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना निवडणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, एका माजी मॉडेलने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पवर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. 90 च्या दशकात प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम करणाऱ्या स्टेसी विल्यम्स यांनी सांगितलं की, जेफ्री एपस्टाईनच्या माध्यमातून ट्रम्प यांची भेट झाली होती. न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये त्यांनी तिचा विनयभंग केला होता. एपस्टाईनने 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या केली.
पेनसिल्व्हेनियाचे मूळ रहिवासी असलेले 56 वर्षीय विल्यम्स यांनी सर्व्हायव्हर्स फॉर कमला नावाच्या ग्रुपने आयोजित केलेल्या कॉलवर या घटनेबद्दल खुलासा केला. हा ग्रुप डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिसला यांना पाठिंबा देत आहे. ५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या टीमने हे आरोप स्पष्टपणे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
जनतेनं नाकारलं तरीही जिंकले.. अमेरिकेच्या या पाच राष्ट्राध्यक्षांचा किस्साच खास!
द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, विल्यम्स यांनी सांगितलं की, 1992 दरम्यान एका ख्रिसमस पार्टीमध्ये ट्रम्प आणि तिची भेट झाली होती. विल्यम्सने आरोप केला की काही महिन्यांनंतर एपस्टाईनने तिला न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर्समध्ये ट्रम्प यांना भेटण्यासाठी बोलवलं होतं. ट्रम्प यांनी तिचे प्रेमाने स्वागत केलं, परंतु नंतर त्यांनी तिला विविध ठिकाणी अयोग्यरित्या स्पर्श केला. ती म्हणाली की, मी अस्वस्थ झाली होती.
मला लाज आणि किळस वाटली. ट्रम्प मला खूप घृणास्पद वाटले आणि मला आठवते की मी पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यानंतर मी एपस्टाईनशी संबंध तोडले. पण ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, अनेक महिलांनी यापूर्वी त्यांच्यावर अशाच प्रकारचे वर्तन केल्याचा आरोप केला आहे, ज्यात संमतीशिवाय चुंबन घेणं, अयोग्य स्पर्श करणं आणि चेंजिंग रूममध्ये हँग आउट करणं असं समाविष्ट आहे.