डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने बनवले श्रीमंत; प्रॉपर्टी डील अन् लायसन्सिंगमधून कोट्यवधींची कमाई
Donald Trump पुण्यातील ट्रम्प टॉवर प्रकल्पातून भविष्यात 289 दशलक्ष डॉलर्सची कमाई होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Donald Trump Earn 81 Cr From India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात मोठी कमाई केल्याचे समोर आले आहे. प्रॉपर्टी डील आणि लायसन्सिंगमधून ट्रम्प यांनी थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 81 कोटी रुपये कमावले आहेत. नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक संपत्तीच्या तपशीलातून ही माहिती समोर आली आहे. 2025 या वर्षात ट्रम्प यांनी केवळ प्रॉपर्टी डील आणि लायसन्सिंगच्या माध्यमातून जगभरातून मोठी कमाई केली असून, यात भारताचाही मोठा वाटा आहे.
भारतातून किती झाली कमाई?
मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्ली आणि गुरुग्रामसारख्या प्रमुख शहरांमधील ‘ट्रम्प टॉवर’ (Trump Tower) प्रकल्पांच्या लायसन्स फीद्वारे भारतातून 8.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 81 कोटी रुपये) कमावले आहेत. याआधी 2024 मध्ये त्यांनी मुंबईतील एका प्रकल्पाच्या लायसन्सिंगद्वारे 10 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती. सध्या भारतात ट्रम्प ब्रँडचे एकूण आठ प्रकल्प सुरू किंवा नियोजित आहेत. तसेच, पुण्यातील ट्रम्प टॉवर प्रकल्पातून भविष्यात 289 दशलक्ष डॉलर्सची कमाई होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जागतिक स्तरावर असा आहे विस्तार
ट्रम्प यांनी केवळ भारतातच नव्हे, तर कतार, वियतनाम, ओमान आणि दुबईमध्येही मोठ्या प्रमाणात मालमत्तेशी संबंधित करार केले आहेत. या सर्वांतून त्यांना 2025 मध्ये एकूण 26 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2.6 कोटी डॉलर्स) इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. यामध्ये दुबईतील रिअल इस्टेट व्यवहारातून झालेली कमाई सर्वाधिक असल्याचे समजते.
केवळ रिअल इस्टेटच नाही, तर ट्रम्प यांच्या कमाईचे इतरही अनेक मार्ग आहेत. त्यांनी क्रिप्टो फर्म, फिफा वर्ल्ड कपचे तिकीट विक्री आणि गोल्फ क्लबच्या व्यवसायातून मोठी संपत्ती जमा केली आहे. त्यांच्या या व्यवसायात कुटुंबातील सदस्यही सक्रिय आहेत. फोर्ब्स मासिकाच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण वैयक्तिक संपत्ती 6.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. जागतिक स्तरावर 20 देशांमध्ये आपला रिअल इस्टेटचा विस्तार करणाऱ्या ट्रम्प यांनी आतापर्यंत या व्यवसायातून 3 अब्ज डॉलर्सची संपत्ती कमावली आहे.