Uttarakhand Tunnel : देवदुतांकडून मजुरांचा कोंडलेला श्वास मोकळा; प्रत्येकी 50 हजारांचं बक्षीस

Uttarakhand Tunnel : देवदुतांकडून मजुरांचा कोंडलेला श्वास मोकळा; प्रत्येकी 50 हजारांचं बक्षीस

Uttarakhand Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील बोगद्यात(Uttarakhand Tunnel) अडकलेल्या 41 मजूरांना बाहेर काढण्यात आलं आहे. बचाव पथकाने 17 दिवस युद्धपातळीवर प्रयत्न करुन मजूरांचा कोंडलेला श्वास मोकळा केला आहे. मजुरांना बोगद्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर देशभरात आनंदाची लहर पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. या मोहिमेतील बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसाठी उत्तराखंड सरकारकडून बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. बचाव पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहन भत्त्याची घोषणा करण्यात आलीयं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी(Pushkar Singh Dhami) यांनी ही घोषणा केलीयं.

उत्तराकाशी जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिलक्यारा बोगद्याचे काम सुरू होतं. केंद्र सरकारच्या चार धाम ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याचे काम सुरू होतं. या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. 12 नोव्हेंबर रोजी या बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे येथे काम करणारे मजूर आतमध्येच अडकून पडले. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू होते. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांच्यासह देशातील आणि परदेशातील विविध तज्ञ्ज या कामात गुंतले होते. ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL उत्तरकाशी बोगद्याच्या बचाव कार्यासाठी तळ ठोकून होते.

Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

बोगद्यात सुमारे 60 मीटर अंतरावर कामगार अडकले होते. आधी हॉरिझाँटल ड्रिलिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, जेवढा राडारोडा बाहेर निघेल तेवढा वरुन आणखी राडारोडा खाली येत होता. यावर उपाय म्हणून महाकाय ऑगर मशीनची मदत घेण्यात आली. ऑगर मशीनने 48 मीटरपर्यंत ड्रील केले होते. पण त्यानंतर मशीनने हात टेकले. मशीन ड्रील केलेल्या भागातच तुटून अडकून पडली. त्यामुळे व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 86 मीटरचे आव्हानात्मक काम होते.

त्याचवेळी हॉरिझाँटल ड्रिलिंगही सुरु ठेवण्यात आले. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी मशीनचे तुटलेले आणि अडकलेले भाग ड्रिंलिंग केलेल्या भागातून कापून वेगळे करण्यात आले. त्यानंतर उर्वरित 10 मीटरचे खोदकाम मानवी हातांनी करण्याचे आव्हान उभे राहिले होते. हे काम दृष्टीपथात येताच कंपनामुळे राडारोडा आणखी खाली येत असल्याने व्हर्टिकल ड्रिलिंग थांबविण्यात आले. हे तब्बल 45 मीटर ड्रिलिंग झाले होते.

दुसऱ्या बाजूला हॉरिझाँटल ड्रिलिंगमध्ये मॅन्युअल ड्रिलिंगसाठी दोन खासगी कंपन्यांची दोन टीम तैनात करण्यात आल्या होत्या. एका टीममध्ये 5 तर दुसऱ्या टीममध्ये 7 तज्ञ्ज होते. या 12 सदस्यांची वेगवेगळ्या कामांसाठी विभागणी करण्यात आली. खोदकाम जसे पुढे जाईल तसे पाठीमागून 800 मिमी व्यासाचा पाइप टाकण्याचे काम सुरु होते. अखेर आज संपूर्ण खोदकाम पूर्ण झाल्यानंतर याच पाईपच्या मदतीने एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा प्रत्येकी एक जवान बोगद्यात मजूर अडकलेल्या भागात गेला आणि तिथून एनडीआरएफच्या टीमने कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube