आता फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा; महिला आरक्षणावर पंतप्रधान मोदींचं मोठ विधान

हे विधेयक मंजूर झाले असते तर मी त्याचे श्रेय विरोधकांना देण्यास तयार होतो, असंही यावेळी मोदींनी सांगितले.

News Photo   2026 04 18T215333.430

नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती (Modi) विधेयक आणि विरोधकांची भूमिका यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी सविस्तर भाष्य केले. काँग्रेस पक्ष नेहमीच सुधारणाच्या आड आलेला आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांवर टीका केली. तसंच, आज आमच्याकडं बहुमत नव्हते. परंतु आम्ही अजूनही हार मानलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले.

भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, आम्हाला देशातील महिलांचा पाठिंबा आहे. महिला आरक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक संकटाला आम्ही बाजूला करू. आमचा विश्वास, हिंमत अजूनही कमी झालेली नाही. महिला आरक्षणाचा विरोध करणारे पक्ष संसद आणि विधानसभेत महिलांची प्रतिनिधित्त्व वाढवण्याला कधीच रोखू शकत नाहीत, असंही मोदी यावेळी म्हणाले.

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर प्रहार

त्याचबरोबर, महिला आरक्षण लागू करण्यासाठी फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. महिलांच्या आरक्षणाबाबत भाजपा आणि एनडीएचा निश्चय अढळ आहे. काल आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही पराभूत झालो, असा त्याचा अर्थ होत नाही. आमचा आत्मविश्वास अजेय आहे. आमचा प्रयत्न चालूच राहील. भविष्यात आम्हाला संधी मिळेल. देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या स्वप्नासाठी, देशाच्या भविष्यासाठी आम्ही आमचा संकल्प पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

याधीही काँग्रेसने सीएए, एनआरसी कायद्याला विरोध केलेला आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी डिजिटल पेमेंटलाही विरोध केला होता. काँग्रेसने कलम 370 हटवण्यालाही विरोध केला होता, असा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी केला. मतदारसंघांची पुनर्रचना केल्यावर दक्षिणेकडील राज्यांना फटका बसणार आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. हा दावादेखील मोदी यांनी यावेळी फेटाळून लावला. हे विधेयक मंजूर झाले असते तर मी त्याचे श्रेय विरोधकांना देण्यास तयार होतो, असंही यावेळी मोदींनी सांगितले.

follow us