तुम्हालाही RBI च्या ‘Digital Rupee’चा मेसेज आलाय? प्रकार काय?; 2 मिनिटांत समजून घ्या

RBI Digital Rupee तुमच्याही मोबाईलवर RBI च्या 'Digital Rupee' बाबत मेसेज आलाय? हा डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय? तो UPI सारखाच आहे की वेगळा?

  • Written By: Published:
RBI Digital Rupee

What Is RBI Digital Rupee Message : तुमच्याही मोबाईलवर RBI च्या ‘Digital Rupee’ बाबत मेसेज आला का? आला असेल, तर हा नेमका प्रकार काय आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. देशात डिजिटल व्यवहारांना आणखी चालना देण्यासाठी RBI ‘डिजिटल रुपया’ (e₹) वापरण्यावर भर देत आहे. पण हा डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय? तो UPI सारखाच आहे की वेगळा? तो वापरणं सुरक्षित आहे का? आणि त्यातून पेमेंट कसं करायचं? असे अनेक प्रश्न सध्या सर्वसामान्यांच्या मनात आहेत. हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.

डिजिटल रुपया म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर डिजिटल रुपया म्हणजे तुमच्या खिशात असलेल्या नोटेचं डिजिटल रूप. फरक एवढाच की, ही नोट कागदावर नसून तुमच्या मोबाईलमध्ये असते. हा कोणताही बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी नाही. तो थेट RBI कडून जारी करण्यात आलेला अधिकृत डिजिटल रुपया (CBDC) आहे. त्यामुळे त्याचं मूल्य रोख पैशाइतकंच आहे.

UPI आणि डिजिटल रुपयात फरक काय?

अनेकांना वाटतं की, डिजिटल रुपया म्हणजे UPI. पण तसं नाही. UPI वापरल्यावर पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जातात. मात्र, डिजिटल रुपयात आधी e₹ Wallet मध्ये पैसे भरावे लागतात. त्यानंतर त्या वॉलेटमधून तुम्ही पेमेंट करता. म्हणजेच, खिशात रोख पैसे ठेवण्याऐवजी ते मोबाईलमधील वॉलेटमध्ये ठेवून वापरण्यासारखं आहे.

डिजिटल रुपयाचे फायदे कोणते?

– खिशात रोख पैसे बाळगण्याची गरज कमी होते.
– कोणत्याही UPI QR Code वर सहज पेमेंट करता येतं.
– सुट्ट्या पैशांचा प्रश्न राहत नाही.
– RBI कडून जारी केलेलं अधिकृत चलन असल्याने अधिक विश्वासार्ह.
– व्यवहार जलद, सोपे आणि पूर्णपणे डिजिटल.

डिजिटल रूपया वापरायचा कसा?

डिजिटल रुपया वापरणंही अगदी सोपं आहे. यासाठी तुमच्या बँकेचं Digital Rupee (e₹) अ‍ॅप डाउनलोड करा. मोबाईल नंबरच्या मदतीने नोंदणी करा. तुमच्या बँक खात्यातून e₹ Wallet मध्ये पैसे भरा. त्यानंतर दुकानातील QR Code स्कॅन करून थेट पेमेंट करा.

डिजिटल रुपया सुरक्षित आहे का?

होय. कारण हा कोणत्याही खासगी कंपनीचा किंवा क्रिप्टोकरन्सीचा प्रकार नाही. डिजिटल रुपया थेट RBI कडून जारी केला जातो. त्यामुळे तो अधिकृत चलन असून त्यावर केंद्रीय बँकेचा विश्वास आणि हमी आहे. त्यामुळे तो वापरणे सुरक्षित मानले जाते.

UPI नंतर Digital Rupee (e₹) एक महत्त्वाचे माध्यम

देशात डिजिटल रुपयाचा वापर सातत्याने वाढत आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी RBI आणि विविध बँका नागरिकांना या सुविधेबाबत माहिती देत आहेत. त्यामुळे भविष्यात दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल रुपयाचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. UPI नंतर आता Digital Rupee (e₹) हे भारतातील डिजिटल पेमेंटचे आणखी एक महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. रोख पैशाचा डिजिटल पर्याय म्हणून तो वापरता येतो. जर तुमची बँक ही सुविधा देत असेल, तर संबंधित Digital Rupee App डाउनलोड करून तुम्हीही या नव्या डिजिटल चलनाचा वापर सुरू करू शकता.

follow us