आरएसएससाठी तरुणपणीच दोन्ही पाय गमविले; राज्यसभेवर जाणारे सदानंदन मास्टरांची अनोखी स्टोरी…

Who Is C Sadanandan Master: केरळला आपण देव भूमी म्हणतो. पण येथील राजकारण मात्र रक्तरंजित. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्यातील संघर्ष कायमचाच. त्यातून संघर्ष टोकाला जावून मुडदे पाडले जातात. याच संघर्षातून आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) अनेक कार्यकर्ते गमवावे लागलेत. असेच एका संघ स्वयंसेवकाचे थेट दोन्ही पाय कापले जातात. पण हा स्वयंसेवक खचून जात नाही. याच स्वयंसेवकाचा सन्मान आता भाजपकडून करण्यात आलाय. हा स्वंयसेवक आता राज्यसभेचा खासदार असणार आहे. या स्वयंसेवकाचे नाव आहे सी सदानंदन मास्टर ( Sadanandan Master). त्यांची संपूर्ण स्टोरीच आपण जाणून घेऊया…
सदानंदन मास्टरांचे कुटुंब कम्युनिस्ट पण…
सदानंदन मास्टर हे कन्नूर जिल्ह्यातील मट्टनूरजवळील छोट्याशी गावातीलच. त्यांचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांचा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखा चालवायचा. कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळा आहे. सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचा जिल्हा. सदानंदन मास्तर हे सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे काम करत होते. परंतु पक्षातील नेत्यांशी त्यांचा वाद झाला. कम्युनिस्ट पक्षाचे काही विचार त्यांना पटत नव्हते. त्यातून ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारांकडे आकर्षित झाले. त्यातून डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या कन्नूरमधून संघ कार्यालय उभारले आणि काम सुरू केले.
बहिणीचे लग्न अन् सदानंदन यांचे पाय कापले !
संघाचे काम करणाऱ्यांवर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे थेट हल्ले होत होते. त्यातून सदानंदन हेही सुटले नाहीत. 25 जानेवारी 1994 रोजी ते आपल्या काकांच्या घरी गेले होते. बहिणीच्या लग्नाबाबत चर्चा करून ते घराकडे परत जात होते. त्याचवेळी रस्त्यावरच सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे दोन्ही पाय हे मांडीपासून कापण्यात आले. पायांची पुन्हा सर्जरी होऊ नये म्हणून पाय हे रस्त्यावरच रगडण्यात आले. त्यावेळी सदानंदन हे अवघ्या तीस वर्षांचे होते. तब्बल सहा महिने ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
सदानंदन यांची साथ वनिताने सोडली नाही
पाय काढण्यापूर्वी सदानंदन यांचेही लग्न ठरलेले होते. त्यांच्याच बीएडच्या वर्गात शिकणाऱ्या वनिता हिच्याशी त्यांचा विवाह ठरला होता. दोघांचेही शिक्षण संपलेले होते. पण पाय गेल्यानंतर सदानंदन यांनी वनिताशी लग्न करण्यास नकार दिला. पण वनिता ही त्यांच्याशी लग्न करणावर ठाम राहिली. वनिता ह्या सर्व काळात सतत त्यांच्या बरोबर होती. त्यांच्या कुटुंबीयांनी, तिच्या कुटुंबीयांनी, इतकंच काय, ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील वनिता हिने सदानंद यांच्याशी लग्न करण्याच्या निश्चयापासून ढळली नव्हती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही पायाला जयपूर फूट बसविला. त्यानंतर ते हळूहळू चालू लागले. परंतु त्यातही अडथळे होते.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध
सदानंदन मास्टर यांनी दोन्ही पाय गमविल्यानंतर ते घरात बसले नाहीत. कृत्रिम पायाच्या जोरावर त्यांनी नव्याने आयुष्याची सुरुवात केली. ते त्रिशूर जिल्ह्यातील पैरामंगलम येथील एका माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून रूजू झाले. तब्बल 25 वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होते. त्यांची मुलगी यमुना भारती बीटेकची शिक्षण घेत आहे. तर त्यांची पत्नी वनिता या शिक्षक आहेत.
ठाकरे विरुद्ध शिंदे: धनुष्यबाणाची लढाई आता ऑगस्टमध्ये, पुढील तारखेची घोषणा
दोन वेळा विधानसभा लढविली पण अपयशच
सेवानिवृत्तीनंतर सदानंदन हे राजकारणात सक्रीय झाले. ते 2016 आणि 2021 ला भाजपकडून कुथुपरम्बा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. परंतु दोन्ही वेळेस ते पराभूत झाले. सध्या ते भाजप केरळचे उपाध्यक्ष आहेत. आता सदानंदन राष्ट्रपती नियुक्ती सदस्य म्हणून राज्यसभेचे खासदार असणार आहेत. ज्या केरळमध्ये भाजप रुजविण्यासाठी सदानंदन यांनी संघर्ष केला. डाव्यांविरोधात संघर्ष करत तरुणपणी दोन पाय गमविलेल्या सदानंदन यांचा सन्मान पक्षाकडून झालाय.