आता 40 किमी दूरच्या रेस्टॉरंटमधूनही मागवता येणार जेवण; Zomato ने आणले नवे फीचर

Zomato Limitless Delivery : घरापासून दूर असलेल्या आवडत्या रेस्टॉरंटमधील जेवणाची चव आता घरबसल्या चाखता येणार आहे, Zomato चा नवा निर्णय.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 07T182459.295

Zomato Limitless Delivery : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने ग्राहकांसाठी Limitless Delivery हे नवे फीचर सुरू केले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आपल्या घरापासून तब्बल 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेस्टॉरंटमधूनही जेवण मागवता येणार आहे. आतापर्यंत ग्राहकांना प्रामुख्याने घराजवळील परिसरात डिलिव्हरी देणाऱ्या रेस्टॉरंटचे पर्याय दिसत होते. मात्र, नव्या सुविधेमुळे आता शहरातील दूरच्या भागातील रेस्टॉरंटचे पदार्थही ऑर्डर करण्याची संधी मिळणार आहे.

या फीचरमुळे ग्राहकांना आपल्या शहराच्या दुसऱ्या भागातील आवडत्या रेस्टॉरंटमधूनही जेवण मागवता येईल. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती गुरुग्राममध्ये राहत असेल आणि तिला दिल्लीतील एखाद्या रेस्टॉरंटमधील पदार्थ आवडत असतील, तर ती Zomato वर त्या रेस्टॉरंटचे नाव शोधू शकते. संबंधित रेस्टॉरंट Limitless Delivery अंतर्गत ग्राहकाच्या डिलिव्हरी पत्त्यावर सेवा देत असेल, तर तिथून जेवण मागवता येईल. ग्राहकांना आसपासच्या रेस्टॉरंटपुरते मर्यादित न ठेवता अधिक पर्याय उपलब्ध करून देणे हा या सुविधेमागील उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Limitless Delivery वापरण्यासाठी ग्राहकांना वेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. Zomato च्या सध्याच्या अॅपमध्येच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अॅप उघडल्यानंतर होम स्क्रीनवरील Explore More या विभागात जावे लागेल. तिथे Limitless Delivery ची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर या सुविधेअंतर्गत डिलिव्हरी देणाऱ्या रेस्टॉरंटची यादी समोर येईल. त्यातून आवडते रेस्टॉरंट निवडून मेन्यूमधील पदार्थ ऑर्डर करता येतील.

गोकुळच्या चार संचालकांच्या नियुक्तीवर फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; शिंदे-पवारांची संमती होती का?

या सुविधेचा वापर करण्याचा दुसरा पर्यायही ग्राहकांना देण्यात आला आहे. एखाद्या विशिष्ट रेस्टॉरंटमधून जेवण मागवायचे असल्यास Zomato च्या सर्च बारमध्ये त्या रेस्टॉरंटचे नाव टाकता येईल. संबंधित रेस्टॉरंट ग्राहकाच्या पत्त्यावर Limitless Delivery अंतर्गत सेवा देत असेल, तर ते सर्चमध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे पदार्थ निवडून ऑर्डर देता येईल. त्यामुळे दूरच्या भागातील आवडत्या रेस्टॉरंटचा शोध घेणेही सोपे होणार आहे.

सध्या Zomato ने ही सुविधा देशातील सात प्रमुख शहरांमध्ये सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली-NCR, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील ग्राहकांना आपल्या डिलिव्हरी पत्त्यापासून 40 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील रेस्टॉरंटचे पर्याय पाहता येणार आहेत. मात्र, प्रत्येक रेस्टॉरंट या सुविधेत उपलब्ध असेलच असे नाही. संबंधित रेस्टॉरंटकडून ग्राहकाच्या पत्त्यावर डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

दरम्यान, 40 किलोमीटर अंतरावरून जेवण मागवल्यास ग्राहकांना अतिरिक्त डिलिव्हरी शुल्क द्यावे लागणार का, याबाबत कंपनीने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. Limitless Delivery अंतर्गत येणाऱ्या ऑर्डरसाठी स्वतंत्र डिलिव्हरी चार्ज आकारला जाणार की नाही, हेही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ग्राहकांनी ऑर्डर निश्चित करण्यापूर्वी अॅपवर दिसणारे एकूण बिल तपासणे आवश्यक आहे. डिलिव्हरी चार्ज, प्लॅटफॉर्म फी आणि इतर शुल्क ऑर्डरनुसार वेगवेगळे असू शकतात.

follow us