‘मुक्ता टिळकांमुळेच मनसेनं माझं तिकीट कापलं, आता पोटनिवडणुक लढवणार’

‘मुक्ता टिळकांमुळेच मनसेनं माझं तिकीट कापलं, आता पोटनिवडणुक लढवणार’

पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या की, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणुक लागणार आहे. पक्षाने आदेश दिला तर मी ही पोटनिवडणुक लढण्यास तयार आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासून मुक्ता टिळक या आजारी होत्या. या आजारपणात देखील त्यांनी जितके शक्य तेवढं काम त्यांनी केलं आहे. आता त्यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झालीच तर मतदार ठरवतील नक्की कुणाला निवडून द्यायचं ते, जर माझ्या पक्षाने येथून निवडणूक लढवण्यासाठी मला आदेश दिला तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी याबाबत बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, याआधी पंढरपूरची आणि मुबंईची पोटनिवडणुक झाली आहे. मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना किती त्रास झाला आणि तो कोणी दिला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आताची कसब्यातील पोटनिवडणूक हसत खेळत झाली पाहिजे, शेवटी या मतदार संघातील सुमारे चार ते पाच लाख मतदारांच्या विकासाचा प्रश्न आहे, असे रोखठोक मत व्यक्त करत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मनसेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने माझं तिकीट ऐनवेळेस ज्या कारणासाठी कापलं ते कारण म्हणजे मुक्ता टिळक होत्या. मुक्ता टिळक यांना भाजपकडून न्याय देण्यासाठी तिकीट दिलं होतं आणि या कारणानेच मनसेने माझं तिकीट कापलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. पुढे त्या म्हणाल्या, त्यावेळेस आम्ही कॉम्प्रमाईज केलं, कारण मुक्ताताई या आमच्या सहकारी होत्या, मात्र आता पोटनिवडणुक व्हायला हवी.

मुक्ता टिळक या आजारी असल्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात कोणतीही विकासाची कामे झाली नाही. दरम्यानच्या काळात त्यांना आजाराचा खूप त्रास होता. त्यामुळे राजकारणात आजारपणापेक्षा काही मोठं नसतं. या पोटनिवडणुकीत जनता जो कौल देईल तो मान्य असेल. त्यामुळे ही पोटनिवडणूक खेळीमेळीत व्हायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केलं.

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आपण येथून निवडणूक कशी लढणार? या माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नावर रूपाली पाटील म्हणाल्या, राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे जर मला पक्षाने आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणारच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितलं.

दरम्यान, रूपाली पाटलांनी कसबा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा तर व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणाहून आपला उमेदवार देणार का? आणि दिला तर रूपाली पाटलांना संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube