महाविकास आघाडी आक्रमक, विधान सभेच्या कामकाजावर बहिष्कार

महाविकास आघाडी आक्रमक, विधान सभेच्या कामकाजावर बहिष्कार

नागपूर : आज नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं दिसून आलं. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी काळ्या पट्टया बांधून सरकारचा निषेधही केला.

‘बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है’, ‘कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब, कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध,’ ‘लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो,’ ‘कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय,’ ‘सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो’. अशा प्रकारच्या घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.

कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विधान सभेच्या कामकाजावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. तर, विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

गुरूवारी विरोधकांनी सभात्याग केला. तसेच विरोधकांकडून एनआयटी भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तर, दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. दोन्ही बाजूंकडून गदारोळ सुरू असल्याने विधानसभेचे कामकाज काही वेळेस स्थगित करण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube