अहमदनगरच्या नामांतरासाठी आजपासून जिल्ह्यात रथयात्रा
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ करा अशी मागणी होत असून या मागणीसाठी आज (गुरुवार) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक नगर नामांतर कृती समितीच्यावतीने रथयात्रा काढण्यात येणार आहे. नामांतराची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आ. राम शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकार यांनी केली होती.दरम्यान, या रथयात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गुरुवारी (दि.९) सकाळी या रथयात्रेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकलोडी येथील मुख्य मानकरी खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरांदे महाराज यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोठे देसाई यांच्या उपस्थितीत होणार होणार आहे. ही यात्रा जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी मार्गे नगर शहरात येणार आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर २० फेब्रुवारी रोजी यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून ही मागणी लोकाभिमुख करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीयचे ठराव, खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे नामांतराला पाठिंब्याचे पत्र घेतले जाणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आदींनी विधानपरिषदेत केली होती. त्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानंतर राज्यस सरकारनेही यासाठी सकारात्मकता दर्शवली होती. विधानपरिषदेत या मागणीला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी नामांतरासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता जिल्ह्यातून रथयात्रा निघत आहे. या यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीसाठी ही रथयात्रा निघणार आहे. या मागणीसाठी राज्य सरकारही अनुकूल आहे. त्यामुळे या घडामोडींचा काय परिणाम होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.