राम शिंदे यांची नामांतराची ‘गुगली’ ; रोहित पवार यांचा ‘सेफ’ खेळ

राम शिंदे यांची नामांतराची ‘गुगली’ ; रोहित पवार यांचा ‘सेफ’ खेळ

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या मुद्द्यावर पुढाकार घेत माजी मंत्री आ.  राम शिंदे (Ram Shinde) यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले.  त्यांनी टाकलेल्या या गुगलीमुळे त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Raddhakrishna Vikhe) पाटील बॅकफूटवर गेले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चाणाक्षपणे चौंडी (ता. जामखेड) येथून निघालेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतर रथयात्रेला  उपस्थिती दर्शवत सेफ खेळी केली. कर्जत-जामखेड मतदारसंघातील विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे आमदार रोहित पवार यांच्यातील मतभेद नवीन नाहीत. तरी देखील आ. पवार यांनी गुरुवारी चौंडी (ता. जामखेड) येथून निघालेल्या नामांतर रथयात्रेला हजेरी लावली.

अहमदनगर जिल्ह्याला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ नाव देण्याच्या मागणीसाठी चौंडी येथून रथयात्रा निघाली. नगर जिल्ह्याला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी करतानाच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती रथयात्रेच्या आपण सोबतच आहोत, अशी भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

गुरुवारी सकाळी ११ वाजता चौंडीहून नामांतर रथयात्रेस खेलोबा राजाभाऊ वाघमोडे उर्फ फरांदे महाराज श्रीक्षेत्र गुरुदेव देवस्थान पट्टणकलोडी जि.कोल्हापूर येथील मुख्य मानकरी व भाकणूककार यांच्या हस्ते व श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थानचे पुजारी नारायण खानू मोठे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विजय तमनर, सचिन डफळ, निशांत दातीर, राजेंद्र तागड, अक्षय भांड, दत्तात्रय खेडेकर, अशोक होनमाने, विनोद पाचरणे यावेळी उपस्थित होते. नामांतर रथयात्रा ९ फेब्रुवारी २०२३ चोंडी येथून कर्जत, श्रीगोंदा येथे मुक्कामी आहे.

नामांतराची मागणी कुणा एकाची नाही

आ. पवार म्हणाले, की नगर जिल्ह्याला पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली. ही मागणी कोणा एकाची नसून सर्वांनी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या इतकी कार्यकुशलता असलेले व्यक्तिमत्व नाही.पुढील काळात ही मागणी विधानपरिषदेत आली तर आपण नक्कीच सहभागी होणार आहे. चोंडी येथील विकासकामांना प्राधान्य देत ९ कोटी रुपयांची नव्याने कामे केली जाणार आहेत. पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीआधी जिल्ह्याचे नामांतर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आगामी अधिवेशनदरम्यान हा विषय मार्गी लावण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेकडे आ. राम शिंदे यांनी मात्र पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube