‘त्या’ 40 आमदारांच्या बंडाला संजय राऊत कारणीभूत- आमदार संजय गायकवाडांचा आरोप

‘त्या’ 40 आमदारांच्या बंडाला संजय राऊत कारणीभूत- आमदार संजय गायकवाडांचा आरोप

बुलढाणा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाते. भाजपपासून शिवसेनेचं विभक्त होणं ते महाविकास आघाडी स्थापन करण्यात संजय राऊतांचा मोठा वाटा होता. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर देखील संजय राऊत त्याच आक्रमकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करीत होते.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेकडून त्या आमदाराविरोधात टीका केली जात होती. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्या 40 आमदारांच्या बंडामागे संजय राऊत यांचे वात्रट बोलणं हेच कारण होतं असा आरोप केला आहे.

संजय राऊत यांचं वात्रट तोंड, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता त्याला कंटाळून आमदार फुटले. आमदारांनी उठाव केला, असं सांगत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

संजय गायकवाड यांनी यावेळी 40 आमदारांच्या उठावाला संजय राऊतच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूखंड घोटाळ्यात कोर्टाने क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीचा प्रश्नच येतो कुठे? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.

ठाकरे सरकार असताना कोणत्याच प्रकारची कामे होत नव्हती. आमदारांना वर्षावर प्रवेश नव्हता. मातोश्रीवर प्रवेश नव्हता. घरून सरकार चालवलं जायचं. त्यामुळे दोन वर्षाने आमदार लोकांना उत्तर काय देणार? हा प्रश्न होता. म्हणूनच सर्व आमदारांनी उठाव केला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर जो अन्याय सुरू होता, त्यामुळे आमदार त्यांच्यापाठी उभे राहिले, असं संजय राठोड यांनी सांगितलं.

खोक्यांसाठी 40 आमदारांनी शिवसेना सोडली. त्यामुळे या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यावर गायकवाड यांनी हे प्रत्युत्तर दिलं.

राऊत यांनी कितीही वात्रटपणा आणि चभरेपणा केला तरी त्यांची टीका लोकांच्या पचनी पडणार नाही. कारण 11-11 मंत्री सत्तेतून बाहेर गेले. कोणी पैशासाठी मंत्रिपद सोडत नसतं.

पाच-पाचशे आणि हजार-हजार कोटी घेऊन लोकं मंत्रीपदासाठी तडफडत असतात. त्यामुळे आता जे आरोप केले जात आहेत, ते नालायकासारखे आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube