मते ट्रान्सफर झाली पाहिजेत….अशोक चव्हाणांनी थेट सांगितले

मते ट्रान्सफर झाली पाहिजेत….अशोक चव्हाणांनी थेट  सांगितले

मुंबई : सत्ताधारी पक्षातील नेते हे विरोधकांना दुश्मनाची वागणूक देत असतील तर ही शोकांतिक आहे. मात्र, शत्रूत्वाच्या भावनेनं जे राजकारण केलं जातं, ते फार काळ टिकणार नाही. हे वातावरण आपण बदलू शकतो. मात्र, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम करणं गरजेचं आहे, अशी भावना कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी बोलून दाखवली. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) काल मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीला चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांच्या राजकीय वृत्तीवरही जोरदार प्रहार केला.

चव्हाण म्हणाले, भाजपला रोखायचं असेल तर शिवसेनेला सोबत घेतलं पाहिजे. तरच हे राज्य चांगल्या पद्धतीने चालेल आणि राज्यासह देशामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण होईल, हे पक्षाच्या वरिष्ठांना पटवून दिलं, त्यानंतर मविआ सरकार राज्यात स्थापन झालं होतं. आज महाविकास आघाडीचं सरकार राज्यात नाही. राज्यात भाजपचं सरकार आहे. मात्र, भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतं, ते पाहता भाजपला लगाम घालणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एकोप्याने काम करावं लागेलं, असं सांगत महाविकास आघाडीच्या एकजुटीच्या आवश्यकतेवर त्यांनी भाष्यं केलं.

येणाऱ्या निवडणुका एकत्र लढलो नाही, तर देशात हुकूमशाही येईल, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिलं. त्यांनी सांगितलं की, गेल्या अडीच वर्षात कधीही अशी वेळ आली नाही, की सरकार कोसळेल. कारण उद्धव ठाकरेंनी तीनही पक्षाच्या लोकांना सन्मानाची वागणूक दिली. जेव्हा शिवसेना आणि भाजपचं सरकार अस्तित्वात होतं, तेव्हा विद्यमान आजच्या सरकारमधील लोक माझ्याकडे येत होती, आणि भाजपला कंटाळलो, असं सांगत होती. मात्र, आज भाजप विषयी कुरबुरी करणारी लोकच आज भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरातांचाच माणूस काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी, पटोलेंकडून शिक्कामोर्तब

ज्यावेळेस मविआ सरकार पडायची वेळ आली, तेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची अडचण होत असेल तर आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. मात्र, तुम्ही मुख्यमंत्री राहा, असं आम्ही ठाकरेंना सांगितलं होतं, असंही ते म्हणाले. आज जनमाणसात ही भावना आहे की, राज्य पातळीवर जे आपण महाविकास आघाचीचं नवं राजकीय समीकरण अस्तित्वात आणलं होतं, ते आता आपल्याला जिल्हा पातळीवरही अस्तित्वात आणणं गरजेचं आहे. तरच महाविकास आघाडीची वज्रमूठ भाजपच्या नाकात वेसण घालू शकेल. जर राज्यात आपलं सरकार आणायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर केवळ नेत्यांनाच नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही धाडसानं पुढं येऊ काम करावं लागेल, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी मते ट्रान्सफर झाली पाहिजेत, असंही सांगितलं.

दरम्यान, आज सरकारच्या तिजोरीत पैसा नसतांना फक्त घोषणांचा पाऊस होतोय, मात्र प्रत्यक्षात कष्टकरी, शेतकरी यांच्याबाबत सरकार काही निर्णय घेत नाही, अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

काल झालेल्या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube