सत्यजितबद्दल बाळासाहेबांना आधीच सांगितलं होतं, अजित पवारांचा गौप्यस्फोट

सत्यजितबद्दल बाळासाहेबांना आधीच सांगितलं होतं, अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : ‘सत्यजित तांबेंच्यासंदर्भात दोन-तीन दिवसांपासून कानावर येत होतं. त्यावेळी आदल्या दिवशी मी स्वतः बाळासाहेब थोरातांशी बोललो. असं काही तरी कानावर येतय तुम्ही काळजी घ्या. काही तरी वेगळं शिजतय अशी बातमी आहे. हे देखील थोरातांना सांगितले होतं. यावेळी ते मला म्हणाले होते की, आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. उद्या डॉ. सुधीर तांबेंचाच फॉर्म येईल असंही बाळासाहेब म्हणाले होते.’ असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

‘आमचं ठरलं होतं नाशिक विभागामध्ये कॉंग्रेसने महाविकास आघाडीकडून उमेदवार द्यावा, कोकण विभागामध्ये शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीकडून उमेदवार द्यावा, औरंगाबाद विभागामध्ये राष्ट्रवादीने महाविकास आघाडीकडून उमेदवार द्यावा, नागपूर विभाग आणि अमरावती विभागाबाबत चर्चा होणार होती. कारण आम्हाला उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भूजबळ, नाना पटोले, यांच्याशी चर्चा करावी लागते.’ असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन मोठा ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर भाजपने सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिलाय.

दरम्यान, भाजपने राज्यातील पाचही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेआधीच जाहीर केले होते. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सस्पेंस ठेवण्यात आला होता. मागील 20 वर्षांपासून कॉंग्रेसचे एकनिष्ठ समजले जाणारे तांबे पिता-पुत्रांकडून उमेदवारीबाबत असा गेम खेळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube