CWC मधून बाळासाहेब थोरातांना डच्चू; ‘या’ एका कारणामुळं पत्ता कट?

CWC मधून बाळासाहेब थोरातांना डच्चू; ‘या’ एका कारणामुळं पत्ता कट?

CWC : यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) काँग्रेसने (Congress) आपली नवी टीम तयार केली आहे. नव्या काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजेच काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या वर्किंग कमिटीची आज घोषणा केली. या कमिटीत महाराष्ट्रातील  आठ नेत्याचा समावेश करण्यात आला. मात्र आधीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना या वर्किंग कमिटीत स्थान मिळालं नाही. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचाही नव्या कार्यकारिणीत समावेश नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी थेट हे संगमनेरमध्ये प्रचारासाठी आले होते. त्या निवडणुच्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचं कमळ हातात घेतलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस चांगलीच बॅकफूटवर गेल्याचे चित्र होतं. मात्र, थोरात निष्ठेने पक्षासोबत राहिले. याशिवाय थोरात हे गांधी घराण्याच्या निवटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यावेळी राहुल गांधी संगमनेरमध्येच मुक्काम केला होता. तेव्हा थोरात यांना मोठी संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते. भविष्यातही असेच घडले.

‘केनेडी’ने मेलबर्न फेस्टिवलची सांगता! सनी लिओनीची रेड कार्पेटवर खास झलक 

बाळासाहेब थोरात यांना राज्यात तर संधी मिळालीच. पण, त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय समितीवरही घेण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते स्थापन करण्यात देखील बाळासाहेब थोरात यांचा महत्वाचा वाटा होता. मात्र, पुढं एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानं महाविकास आघाडी सरकार पडलं. त्यानंतर विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. त्यात थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंड केलं. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर अपक्ष म्हणून सत्यजीत यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सत्यजित हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती. त्वावेळी रुग्णालयात असलेले थोरात यांचीही त्यांना साथ असल्याचं मानलं जातं होतं. सत्यजित थेट भाजपमध्ये दाखल झाले नसले तरी भाजपच्या पाठिंब्याने ते विजयी झाले. त्यानंतर तांबे यांच्यावर पक्षाने कारवाई केली. थोरात यांनाही टीका आणि चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने थोरातांच्या तक्रारी हायकमांडकडे केल्याचं बोलल्या गेलं.

सत्यजीत यांनी केलेलं बंड, सत्यजीत यांची भाजपच्या नेत्यांशी असलेली जवळीकता या सर्वांचा फटका बाळासाहेब थोरात यांना बसल्याचं मानलं जातं आहे. त्यामुळंच त्यांनी यावेळी वर्किंग कमिटीत स्थान मिळालं नसल्याची चर्चा आहे.

CWC ची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. काँग्रेसमधील अनेक मोठे निर्णय ही समिती घेते. आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह काँग्रेसवर नाराज असलेल्या G-23 च्या अनेक नेत्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र थोरातांना वगळ्यानं आता ते पाऊल उचलतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

कमिटीत कोण?
या कमिटीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह 39 वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक यांचा समावेश करण्यात आला आहे. तर रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांचा निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube