Nana Patole यांच्यासोबत काम करणं अशक्य, Balasaheb Thorat यांची हायकमांडकडे तक्रार

Nana Patole यांच्यासोबत काम करणं अशक्य, Balasaheb Thorat यांची हायकमांडकडे तक्रार

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील वाद आता समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे थोरात यांनी म्हंटले आहे. यामुळे काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांचे वाद चव्हाट्यावर आले असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी थोरातांनी पदवीधर निवडणुकीतील विजयासाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे थोरात म्हणजे, या विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं, अशा शब्दात थोरातांनी नाराजी व्यक्त केली.

पुढे बोलताना थोरात यांनी नाना पटोले यांच्यावरील नाराजी देखील जाहीररीत्या व्यक्त केली. तत्पूर्वी काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्यावर थेट आरोप केले. एबी फॉर्म वाटपाच्या घोळावरून तांबेंनी थेट पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे पटोले हे अडचणीत सापडले.

एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही थेट हायकमांडकडे पटोले यांची तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं देखील थोरात म्हणाले आहे. त्यामुळे पटोले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

थोरात म्हणाले, विधान परिषद निवडणुकीमधील राजकारणाद्वारे मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली. माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube