Download App

Bihar Election 2025 : एनडीए पुन्हा बिहार राखणार ? पण नितिशकुमारांच्या खुर्चीला तेजस्वी यादवांकडून सुरुंग

नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनने अवघड असल्याचे या कल चाचणीतून दिसून येत आहे. तेजस्वी यादव यांना काहीसा दिलासा देणारा हा कल आहे.

  • Written By: Last Updated:

Bihar Vidhansabha Election 2025 Opinion Poll:येत्या काही महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election 2025) होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे. एनडीएमधील (NDA) भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या पक्ष जेडीयू (JDU)साठी ही निवडणूक अटीतटीच्या असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मतदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत काही संस्थांच्या मतदारांच्या कल चाचण्या येऊ लागल्या आहेत. पुण्यातील रुद्ररुद्र रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटिक्स या संस्थेने येथे मतदारांची कल चाचणी घेतली आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत येताना दिसत आहेत. परंतु नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनने अवघड असल्याचे या कल चाचणीतून दिसून येत आहे. तेजस्वी यादव यांना काहीसा दिलासा देणारा हा कल आहे. तर प्रशांत किशोर यांची बिहारच्या राजकारणात डाळ शिजताना दिसत नाही.


पालकमंत्रिपदावरच काय अडलंय? रायगडवरुन अजितदादांचा सवाल

बिहार राज्यातील मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी रुद्र रिसर्चने ‘Random sampling as per Probability proportional to size sampling (PPS) Methodology’ या सर्वेक्षण पद्धतीचा वापर केलाय. तसेच सखोल माहिती जाणून घेण्यासाठी राजकीय विश्लेषक, नेते आणि विविध सामाजिक समुहांसोबत चर्चा केली. राज्यातील सर्व विभागातील विविध 25 विधानसभा मतदारसंघातील विविध जातीमधील 15 हजार मतदारांपेक्षा अधिक मतदारांचा कौल जाणून घेतला. संस्थेने 22 मार्च 2025 ते 22 एप्रिल 2025 या कालावधीत संबंधित सर्वेक्षण पूर्ण केले.

मोदी सरकाराबाबत ‘बिहारीबाबू’ समाधानी आहेत का ?
बिहारमधील मतदारांमध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील जेडीयू-भाजप सरकार यांच्या कामगिरीवर संतुष्ट असलेल्या मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. जवळपास 56 टक्के मतदार मोदी सरकारवर अधिक प्रमाणात समाधानी दिसून येतात तर 12 टक्के मतदार काही प्रमाणात समाधानी दिसून येतात. तसेच 42 टक्के मतदार अधिक प्रमाणात मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारवर समाधानी असल्याचे दिसून आले. तर 16 टक्के मतदार राज्य सरकारवर काही प्रमाणात समाधानी असल्याचे दिसून आले.


नितीश कुमारांविरोधात नाराजी

मोदी सरकारवर 30 टक्के तर नितीश कुमार सरकारवर 40 टक्के मतदार असमाधानी असल्याचे दिसून आले. बेरोजगार आणि स्थलांतराच्या समस्येवरून हा मतदार दोन्ही सरकारवर नाराज असल्याचे दिसून आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रेल्वे, रस्ते, पूल निर्माण तसेच इतर पायाभूत सुविधा मध्ये गुंतवणूक, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना, उज्ज्वला योजना, प्रत्येक घरात वीज आणि आयुष्मान योजनांवर लोक समाधानी असल्याचे त्यांच्याशी केलेल्या संवादातून स्पष्ट झाले. तसेच, हिंदुत्व, राष्ट्रवाद, मोदींची लोकप्रियता, राम मंदिर आणि वक्फ बिल सारख्या विषयांवरून अधिक मतदार मोदी सरकारवर समाधानी असल्याचे दिसून आले.


विरोधी पक्षनेता म्हणून तेजस्वी यादव यांची कामगिरी

विरोधी पक्ष नेता म्हणून तेजस्वी यादव यांची चांगली कामगिरी राहिल्याचे दिसून आले. जवळपास 45 टक्के मतदार त्यांच्यावर अधिक समाधानी दिसून आले तर 12 टक्के मतदार त्यांच्यावर काही प्रमाणात समाधानी दिसून येतात. तसेच 39 टक्के मतदार त्यांच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री म्हणून आपली कुणाला पसंती आहे?

मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न मतदारांना विचारला असता, बिहारमधील 35 टक्के मतदारांनी राजद (RJD) नेते तेजस्वी यादव यांना पसंती दिल्याचे दिसून येते. तेजस्वी यादव यांचा युवा मतदारांशी असलेला संपर्क, यादव आणि मुस्लिम समाजावर असलेला प्रभाव, बेरोजगारी आणि स्थलांतर याविरुद्ध उभारलेला लढा, उपमुख्यमंत्री असताना केलेली कामगिरी, वेळोवेळी विविध प्रश्नांना घेऊन विधानसभेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणे या सर्व मुद्द्यांमुळे तेजस्वी यादव यांना अधिक पसंती असल्याचे मतदारांसोबत केलेल्या संवादातून आढळून आले. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या क्रमांकाची पसंती विद्यमान मुख्यमंत्री जेडीयू नेते नितीश कुमार यांना मिळत असल्याचे दिसून आले. त्यांना जवळपास 25 टक्के मतदारांची पसंती मिळत आहे. नितीश कुमार यांचा कुशवाह समाजावर असलेली पकड, महिलांमधील लोकप्रियता आणि एनडीएची मिळत असलेली साथ यामुळे त्यांना ही पसंती मिळत असल्याचे मतदारांशी केलेल्या संवादातून आढळून आले. त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिका, भाजपावरील अवलंबत्व, रोजगार आणि स्थलांतर या समस्या सोडवण्यात आलेले अपयश यामुळे त्यांना कमी पसंती मिळत असल्याचे मतदारांशी बोलल्यानंतर लक्षात आले.

पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले


चिराग पासवान यांना मतदारांची पसंती

लोक जनशक्ती पार्टी (लोजपा- पासवान) या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना मुख्यमंत्री म्हणून 16 टक्के मतदारांची पसंती असल्याचे आढळून आले. चिराग पासवान यांचा युवक मतदारांवरील प्रभाव, पासवान समाजावरील त्यांची पकड, नरेंद्र मोदी यांच्यासोबतची जवळीकता, भाजपाचा मतदार ज्यांना जेडीयू पसंत नाही त्यांचा चिराग पासवान यांना मिळणारा कौल आणि चिराग पासवान यांची सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका यामुळे त्यांना ही पसंती मिळत असल्याचे मतदारांशी बोलल्यानंतर समजून आले. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री म्हणून 8 टक्के मतदारांची पसंती मिळाल्याचे दिसून आले. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मतदारांवर फारशी छाप पाडण्यात आलेले अपयश यामुळे कमी पसंती मिळाल्याचे आढळले.
जनसुराज पार्टीचे नेते प्रशांत किशोर यांना 7 टक्के मतदार मुख्यमंत्री म्हणून पसंती देताना दिसून आले. राज्यात त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांकडून मिळवलेली लोकप्रियता, जाती धर्म विरहीत राजकारण आणि बेरोजगारी आणि स्थलांतर या समस्येंवर त्यांनी राबवलेले अभियान यामुळे त्यांना पसंती मिळताना दिसून आली.


मतदारांसाठी कुठला मुद्दा महत्त्वाचा?

बिहारमधील मतदारांना बेरोजगार आणि स्थलांतर हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटतो. साधारणत: 55 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार या मुद्द्यांची निवड करताना दिसून आले. त्यानंतर भ्रष्टाचार 10 टक्के, पायाभुत सुविधा 8 टक्के, सरकारच्या चांगल्या योजना 7 टक्के, कमजोर प्रशासन 6 टक्के, नोकरीतील आरक्षण 5 टक्के, गुन्हेगारी 4 टक्के आणि इतर मुद्दे 5 टक्के.


कोणत्या पक्षाकडे अधिक कौल?

28 टक्के मतदार हे आरजेडीला पसंती देत असल्याचे दिसून आले. भाजपाला 25 टक्के, जेडीयूला 16 टक्के, काँग्रेसला 7 टक्के, लोजपाला 5 टक्के तर लेफ्ट, जनसुराज, व्हीआयपी, हम आणि अपक्षांच्या बाजूने 16 टक्के मतदारांचा कौल दिसून आला आहे.


महिला मतदार निर्णायक ठरणार

‘रुद्र’ने केलेल्या सर्वेक्षणात महिला मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी महिला मतदारांशी संवाद केला. यातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील महिला मतदार एनडीए आघाडीला अधिक पसंती देत असल्याचे दिसून आले. बिहारमध्ये एकूण मतदारांपैकी 47 टक्के महिला मतदार आहेत. एकूण महिला मतदारांपैकी 49 टक्के महिला मतदार जेडीयू-भाजप युतीच्या उमेदवारांना पसंती देताना दिसून येतात. विशेषत: मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिलांसाठी आणलेल्या लोकप्रिय योजना, त्यांची असलेली सुशासन बाबु अशी प्रतिमा आणि दारूबंदीच्या निर्णयामुळे महिला मतदार नीतीश कुमार यांच्या बाजूने अधिक प्रमाणात वळत असल्याचे दिसून आले. बिहारमधील एकूण महिला मतदारांपैकी 38 टक्के महिला मतदारांचा कौल इंडिया महागठबंधनच्या बाजूने असल्याचे दिसून आले.


जातीय समीकरण

यादव आणि मुस्लिम मतदार ही आरजेडीची ताकद असल्याचे दिसून आले. तसेच व्हीआयपी पक्षाचे नेते मुकेश साहनी यांना मानणारा मल्लाह समाजातील मतदार महागठबंधनच्या बाजूने दिसून आला. तसेच दलित समाजासह रविदास समाजाची काही प्रमाणात महागठबंधनला पसंती मिळताना दिसून आली. काँग्रेसने रविदास समाजातील राजेश कुमार यांना प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले आहे. या रणनीतीमुळे काँग्रेस आणि महागठबंधनला दलित समुदायाची मते मिळण्याची शक्यता दिसून येते. बिहारमधील फॉरवर्ड कास्ट, कुशवाह (कोयरी, कुर्मी), इतर ओबीसी, पासवान आणि मांझी समाजातील मतदार एनडीए गठबंधनला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश प्रमुख दलित नेते जसे की, चिराग पासवान व जितन राम मांझी हे एनडीएसोबत असल्याने दलित मतदार एनडीए गठबंधनला अधिक पसंती देताना दिसून येतात. राज्यातील वयस्कर मतदारांच्या तुलनेत तरूण मतदारांचा कौल अधिक प्रमाणात महागठबंधनच्या बाजूने दिसून आला तर तरूण मतदारांच्या तुलनेत वयस्कर मतदारांचा कौल अधिक प्रमाणात एनडीएच्या बाजूने दिसून आला.

लोजपा पक्षाची एनडीएसोबत राहण्याची भूमिका, केंद्रातील आणि राज्यातील एनडीएचे सरकार आणि त्यांनी राबवलेल्या विविध लोकप्रिया योजना, महिला मतदारांचा एनडीए आघाडीला मिळणारा कौल, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची काही प्रमाणातच असलेली अँटीइन्कबन्सी, जातीय समीकरणांचा होणारा एनडीएला फायदा आणि जितन राम मांझी यांची एनडीएसोबत राहण्याची भूमिका यामुळे बिहार राज्यामध्ये आजच्या स्थितीला इंडिया महागठबंधनच्या तुलनेत एनडीए आघाडी मजबूत दिसून येत आहे. मात्र, 2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे तेजस्वी यादव यांनी बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्याला घेऊन सरकारविरुद्ध वातावरण निर्मिती केली होती, त्यानुसार आगामी काळात देखील हाच मुद्दा घेऊन सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले तर आजची राजकीय परिस्थिती बदलण्याची शक्यता असल्याचे दिसून येते.

follow us