BJP : भाजपने सेट केला खास अजेंडा; शिवसेना-राष्ट्रवादी अन् काँग्रेसची अशी खाणार मते..
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी
नाशिक : भारतीय जनता पार्टीला (BJP) स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. या बैठकीत राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) गेलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची मते भाजपकडे कशी वळवता येतील यावर चर्चा करण्यात आली. पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मताधिक्य २८ टक्क्यांवरून ५० टक्के वर येण्याची रणनीती देखील निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती भाजप राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सन २०१४ मध्ये सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला २८ टक्के मते पडली. शिवसेनेला १९ टक्के, काँग्रेसला १८ टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ टक्के मते पडली. मात्र, आता परिस्थिती बदलली असून शिवसेनेने राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यामुळे त्यांच्याकडील हिंदुत्ववादी मते गोंधळात आहेत. त्यामुळे ही मते आता भारतीय जनता पार्टीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तेच पक्षाचे प्रमुख उद्दीष्ट राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब कल्याणाचे विषय मार्गी लावत असल्यामुळे काँग्रेस किंवा काही प्रमाणात राष्ट्रवादीकडील पारंपारिक मतेही आता भाजपकडे वळत आहेत. अशी सर्व गोळा बेरीज करून ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का भाजपाकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र
दरम्यान, भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये राजकीय ठराव मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांबाबत अभिनंदनाचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसच नव्हे तर भाजपच्या अन्य नेत्यांनाही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात रचण्यात आले होते असा गौप्यस्फोट प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत मांडलेल्या राजकीय ठरावात करण्यात आला.
त्यांचे सरकार गद्दारीतून – शेलार
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गद्दारी हा शब्द समजावून सांगायला हवा. शिवसेनेसोबत स्थापन झालेला सरकार हे गद्दारीमधून आलेले सरकार होते हे अजित पवार यांनी लक्षात घ्यावे, अशी जोरदार टीका भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केली. नाशिकसह अनेक शहरांत महाविकास आघाडी सरकारमुळे विकास खुंटला होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.