नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा
Ram Naik : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वाक् यु्द्धात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक (Ram Naik) यांनी उडी घेतली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांनी मागील इतिहास काढत जी वक्तव्ये केली आहेत त्यात नेमकी कुणाची चूक झाली हे नाईक यांनी विकीपीडियाचा आधार घेत स्पष्ट केले आहे.
नाईक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेली वक्तव्ये माझ्या पाहण्यात आली. फडणवीसांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते, की फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगाव. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळचा भाजपही आमच्या सोबत होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमराव पाटील होते.
Sabrina Siddiqui: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणारी महिला पत्रकार ट्रोल, व्हाईट हाऊसकडून निषेध
त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. योगायोगाने मीही त्यावेळी आमदार होतो. पण या बातम्या पेपरमध्ये वाचल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. नेमकं मला काही विसर पडतोय का असं वाटलं. त्यामुळे मी विकीपीडिया उघडलं. यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला उपमुख्यमंत्री नेमलं होत याची सगळी माहिती आहे. त्या माहितीत शरद पवार यांनी जे उपमुख्यमंत्री नेमले त्यांचे नाव सुंदरलाल सोळंके होते. ते त्यांच्याच पक्षाचे सभासद होते. तर उत्तमराव पाटील त्यावेळी महसूलमंत्री होते. त्यामुळे शरद पवार यांनी स्वतःचा इतिहास एकदा पहावा असं मला वाटतं, असे नाईक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी शरद पवार यांच्यापेक्षा मोठा आहे. शरद पवारांचं वय 82 आहे माझं वय 89 आहे. आणि फडणवीसांच्या तर बालपणचीच ही गोष्ट चालली आहे. इतिहास शिकायची गरज नेमकी कुणाला आहे. यात फडणवीसांची काही चूक झाली आहे का तर तसे मला काही दिसले नाही. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास सगळ्यांनीच करायचा असतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
काय म्हणाले होते पवार
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या 1977 साली स्थापन केलेल्या पुलोद सरकारवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवारांनी सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगाव. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळचा भाजपही आमच्या सोबत होता. फडणवीस तेव्हा लहान असतील त्यामुळे त्यांना माहिती नसेल,पण त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो.मी जे सरकार बनवलं होतं ते सर्वांना सोबत घेऊन बनवलं. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्यातले उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते.