सीमावाद मुद्दा…विरोधकांनी गोंधळ घालून सभात्याग केला
नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. आज विधानसभेत सीमावादावर प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र हा प्रस्ताव आजही मांडण्यात येणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यानंतर विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहातील कामकाजाला उपस्थिती लावली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विधानपरिषदेत राज्यातील शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. इथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा सुरु असताना, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज काय होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला.
दरम्यान आजच्या विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात विरोधकांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून केली. दरम्यान, सीमावादावर विरोधकांनी प्रस्ताव मांडण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव उद्या म्हणजेच मंगळवारी सभागृहात मांडणार असल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून बोलावणे आल्याने ते तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव उद्या मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी गोंधळ घालून सभात्याग केला.