Shivashakti-Bhimshakti Alliance : शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत सुभाष देसाईंकडून महत्वाचे वक्तव्य

Shivashakti-Bhimshakti Alliance : शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत सुभाष देसाईंकडून महत्वाचे वक्तव्य

मुंबई : राज्यातील राजकारणात आज मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती (Shivsena VBA Alliance) आज होण्याच्यी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी ठाकरे आंबेडकर युतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

देसाई म्हणाले, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. दोन मोठे पक्ष एकत्र येताना बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. अनेक मुद्द्यांवर चर्चा करावी लागते. ही चर्चा झाली असून आमचं सगळं ठरलं आहे, असं विधान देसाई यांनी केलं.

दरम्यान गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे युतीसंदर्भातील चर्चांनी आणखी जोर धरला.

मात्र मध्यंतरीच्या काळात आंबेडकरांनी शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हा आंबेडकर शिंदे गटात जाणार का अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र या अफवांना पूर्ण विराम लागला असून यातच देसाई यांनी याबाबत महत्वाची माहिती देखील दिली आहे.

दरम्यान, आज सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून युतीची घोषणा होईल, अशी शक्यता ठाकरे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. शिवशक्ती-भीमशक्ती युतीची बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घोषणा होईल, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

सुभाष देसाई यांच्या प्रतिक्रियेनंतर खरंच शिवशक्ती आणि भीमशक्ती आज एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ठाकरे-आंबेडकर युतीबाबत सूचक विधान केलं होतं. प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल, असं विधान आव्हाडांनी केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube