Marathi Sahitya Sammelan : संमेलनात गोंधळ, मुख्यमंत्र्याच्या भाषणावेळी ‘वेगळा विदर्भ’च्या घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या.नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
दरम्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उद्घाटन भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि घोषणा दिल्या.
वर्धा इथल्या मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस होता. मात्र हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला.
त्यावर आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगळी व्यासपीठ आहेत. सरकारची दारे २४ तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये.
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
आंदोलकांकडून स्वतंत्र विदर्भाची मागणी करता जोरदार घोषणा दिल्या. विदर्भावर उर्जा, पाणी, निधी प्रत्येक गोष्टीत अन्याय होत आहे, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.