छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच, ‘स्वराज्यरक्षक’ हे कोल्हेंचे मार्केटेबल टायटल
मुंबई :’संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच.’ असं स्पष्टीकरण ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी दिलं. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे हे स्पष्टीकरण दिलं.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते. असं वक्तव्य केलं होत. त्यावरून भाजपने अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनं देखील केली. पण त्यानंतर आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत मी काहीही चुकूचं बोललेलो नाही. असं अजित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर आता ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच, ‘स्वराज्यरक्षक’ हे कोल्हेंचे मार्केटेबल टायटल होते. असं म्हटलं आहे.
विश्वास पाटील पुढे म्हणाले की, ‘अस्सल कागदपत्रे सांगतात की, स्वतः संभाजीराजांनी हिंदू धर्मातील अनेक वाईट चालीरीतींचा धिक्कार केला होता. परंतु त्यांनी हिंदू धर्म कधीही सोडला नव्हता. हे त्यांनी स्वतः कोकणातल्या बाकरे शास्त्रांना त्यांच्या हयातीतच स्वतः जे दानपत्र लिहून दिले आहे. आज-काल विशेषत: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते.’
त्यासोबतच त्यांनी इतिहासातील विविध दाखले देत म्हटलं की, ‘तात्पर्य, गेल्या शंभरहून अधिक वर्षे अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख ‘धर्मवीर’ असाच करत आला आहे. ग दि माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजीराजांचा उल्लेख एकदा ‘धर्मभास्कर’ असा केला होता. अन्यथा ‘स्वराज्यरक्षक’ हा किताब शंभूराजांना आपल्या सिरीयलच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरला आहे. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासात कुठेही उल्लेख नाही. कालाय तस्मै नमः ‘