मुख्यमंत्री सुट्टीवर! प्रश्न विचारातचं अजितदादा भडकले, म्हणाले “नॉट रिचेबल माझ्यापुरतं…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर “मला माहित नाही, नॉट रिचेबल माझ्यापुरतं बास झालं. तुम्ही ते मुख्यमंत्री कार्यालयाला विचारा,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण सुरू होताच नागरिकांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की “राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका.”
विकासाची भूमिका पण…
याच मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीची भूमिका विकासाच्या बाजूने आहे पण विकास करत असताना पर्यावरणाचा नास झाला नाही पाहिजे. हे देखील आमचं मत आहे. आमच्या भावी पिढ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. निसर्गाचं नुकसान झालं नाही पाहिजे.
आंदोलन करणाऱ्या लोकांशी बोलून मार्ग काढला पाहिजे. त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. त्यात तथ्य असेल तर ते सोडवला पाहिजे. तथ्य नसेल तर त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे. त्यांत पर्यावरणाचा विषय असेल तर पर्यावरणवाद्यांशी बोलून घेतलं पाहिजे.
मुख्यमंत्री रजेवर पण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर मला माहित नाही, नॉट रिचेबल माझ्यापुरतं बास झालं. तुम्ही ते मुख्यमंत्री कार्यालयाला विचारा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.