कसबा पोटनिवडणुकीवरुन रुपाली पाटलांना शहराध्यक्ष जगतापांनी फटकारले

कसबा पोटनिवडणुकीवरुन रुपाली पाटलांना शहराध्यक्ष जगतापांनी फटकारले

पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एखाद्या राजकीय नेत्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधी होण्याआधीच निवडणुकीची चर्चा करणे हे पुण्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही. यामुळे कोणीही याबाबत वक्तव्य करू नये, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षरीत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना फटकारलं आहे.

जगताप म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाल आहे. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे अस असताना मुक्ता टिळक यांचा दशक्रिया विधी झालेला नसतानाही मागील तीन-चार दिवसांमध्ये त्यांच्या जाण्याने जी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. ती बिनविरोध निवडून द्यावी, म्हणून भाजपमधील काही मंडळी बोलायला लागली आहेत. तसेच इतर राजकीय पक्षातील नेतेमंडळींनी देखील चर्चा सुरू केलेली आहे. ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही.

यामुळे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना दिली आहे की, या संदर्भामध्ये कोणीही कुठलंच भाष्य करू नये. ही पुण्याची राजकीय संस्कृती फार वेगळी आहे. पुण्याने राज्याला आणि देशाला नेहमीच चांगल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

जर माझ्या पक्षाकडून किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून अशा पद्धतीची घाईने निरर्थक चर्चा होत असेल तर हे पुण्याचा संस्कृतीला धरून नाही. हा पुण्याच्या संस्कृतीचा अपमान आहे. खरंतर कुठल्याच राजकीय पक्षाच्या जाण्यानंतर लगेच अशी चर्चा व्हायला नको, अशा शब्दात जगताप यांनी स्व पक्षातील आणि भाजप नेत्यांना सुनावले आहे.

दरम्यान, काल (ता.26 डिसेंबर) रुपाली पाटील यांनी मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक लागणार आहे, ती पक्षाने आदेश दिला तर मी लढण्यास तयार आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

त्या म्हणाल्या होत्या की, २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासून मुक्ता टिळक या आजारी होत्या. या आजारपणात देखील मुक्ताताईंनी जितके शक्य तेवढं काम त्यांनी केलं आहे.

आता आता मुक्ताताईंच्या निधनामुळे कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झालीच तर मतदार ठरवतील नक्की कुणाला निवडून द्यायचं ते, जर माझ्या पक्षाने येथून निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, याआधी पंढरपूरची आणि मुंबईची पोटनिवडणुक झाली आहे. मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना किती त्रास झाला आणि तो कोणी दिला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे.

त्यामुळे आताची कसब्यातील पोटनिवडणूक हसत खेळत झाली पाहिजे, असे रोखठोक मत व्यक्त करत रूपाली पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

दरम्यान, काल रूपाली पाटील यांनी दिलेल्या या प्रतिक्रिवर शहराध्यक्ष जगताप यांनी लगेचच आज आपली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांना सक्त शब्दामध्ये कसबा पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया देणे किंवा चर्चा करणे टाळण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांनी एकप्रकारे रूपाली पाटलांचे कान टोचले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube