Mahrashtra Congress : अशोक चव्हाणांनी थेट दिल्ली गाठली ! नाना पटोलेंचे पद जाणार ?
Ashok Chavan : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाची बोलणे सुरू आहे. त्यात ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. त्यातच राज्यातील काँग्रेसचे (Congress) मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी थेट दिल्ली गाठली आहे. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली आहे. (congress-ashok-chavan-meet-president-malikarjun-kharge)
अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत या भेटीची माहिती दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणूक, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती व सध्याच्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. अशोक चव्हाण हे एकटेच दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच
गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज असून ते भाजपमधील जातील, अशी राजकीय चर्चा सुरू होती. परंतु अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसमधील काही जुने नेते नाराज आहेत. त्यात विदर्भातील काही नेते आहेत. तर बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्यामधील नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरील वाद हा जगजाहीर आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचं ‘हम करे सो कायदा’, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजित पवार आक्रमक…
नाना पटोले यांच्यावर आशिष देशमुख यांनी पत्र काढून आरोप केले होते. काँग्रेसमधील अनेक जण पटोले यांच्यावर नाराज असल्याने त्यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आल्याचे बोलले जात होते. त्यात आता अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस अध्यक्षांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे पटोले यांचे पद आणखी धोक्यात आले आहे.
अशोक चव्हाण महाराष्ट्रातील डीके ?
अशोक चव्हाण यांचे वजन भारत जोडो यात्रेमध्ये दिसून आले होते. नांदेडमध्ये त्यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखविली होती. जागा वाटपावरून काँग्रेसचे राष्ट्रवादी, ठाकरे गटाशी खटके उडू नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यात पटोले यांचेही राष्ट्रवादी व ठाकरे गटातील नेत्यांशी खटके उडतात. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसला अशोक चव्हाणांसारखा नेता हवा आहे. काँग्रेसने कर्नाटक निवडणूक जिंकली आहे. त्या ठिकाणी राजकीय समिकरणे उदयास आली होती. अशोक चव्हाण यांच्यासारखा अनुभवी, पक्ष पुढे नेणारा नेताही काँग्रेसला हवा आहे. अशोक चव्हाण काँग्रेससाठी महाराष्ट्रात डीके शिवकुमार ठरू शकतात, असे बोलले जात आहे.