Congress Politics : राजकारणातील गुगली ‘या’ नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हुकली

Congress Politics : राजकारणातील गुगली ‘या’ नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हुकली

Congress Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramiah) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. आधी या पदासाठी डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) प्रबळ दावेदार होते. त्यांनी दावेदारीही ठोकली होती. नंतर मात्र ज्येष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी दावा मागे घेतला. म्हणजे, त्यांच मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीच. पण, काँग्रेसमध्ये (Congress Politics) हे काही पहिल्यांदाच घडतंय असं काही नाही.

2018 नंतर असे अनेकदा घडले आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतानाही अनेक नेत्यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. असे कोणते नेते होते ज्यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले नाही ते जाणून घेऊ या..

कर्नाटकमध्येच मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. राजकीय घडामोडींनी वळणे घेतली. टेन्शन निर्माण झाले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार दोघेही दिल्लीत तळ ठोकून होते. पक्ष श्रेष्ठींनी मॅरेथॉन बैठका घेतल्या. त्यानंतर शिवकुमार यांनी माघार घेतली.

सचिन पायलट

सन 2018 मध्ये सचिन पायलट (Sachin Pilot) राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. सर्वकाही ठरले होते. पण काँग्रेस नेतृत्वाने ऐनवेळी अशोक गेहलोत यांना संधी दिली आणि पायलट यांना उपमुख्यमंत्री केले. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांतील राजकीय वाद संपलेला नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये तर अशोक गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही म्हटले होते.

टी. एस. सिंहदेव

2018 मध्ये छत्तीसगड काँग्रेसच्या ताब्यात आले. काँग्रेसने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केले. मात्र, टी. एस. सिंहदेव यांचेही नाव स्पर्धेत होते. त्यानंतर मात्र या दोन्ही नेत्यांत दुरावा वाढला. पंचायत आणि ग्रामविकास खात्याचा राजीनामा त्यांनी दिला होता.

प्रतिभा सिंह

यावर्षी मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रसेने हिमाचल प्रदेशात भाजपला सत्तेतून बाहेर केले. यानंतर संभाव्य मुख्यमंत्र्यांची नावे समोर आली. यामध्ये वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांचे नाव आघाडीवर होते. त्यांनी यासाठी प्रयत्न केले. पण, नेतृत्वाने सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला पसंती दिली.

नवज्योत सिंह सिद्धू

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात आजिबात पटत नव्हते. नंतर परिस्थिती इतकी बिघडली की अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या शोधात काँग्रेस असताना सिद्धू यांचे नाव आघाडीवर होते. मीच मुख्यमंत्री होणार असे सिद्धू यांना वाटत होते. पण तसे झाले नाही आणि पक्षाने चरणजितसिंग चन्नी यांना संधी दिली.

हिमंता बिस्वा सरमा आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष सोडला

एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले ज्योतिरादित्य सिंधिया आणि आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही मुख्यमंत्री पद न मिळाल्याने काँग्रेसला रामराम ठोकला. भाजपमध्ये प्रवेश केला. 2018 च्या निवडणुकीत कमलनाथ आणि सिंधिया यांनी काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. सिंधिया यांना वाटत होते की मुख्यमंत्री पद मिळेल. पण कमलनाथ यांना संधी मिळाली. यानंतर सिंधिया यांनी 22 आमदारांसह काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. यामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पडले.

आसाममध्येही असाच प्रकार घडला होता. हिमंता बिसवा सरमा यांनी प्रचंड मेहनत घेऊन 2011 मध्ये काँग्रेसला निवडून आणले. पण काँग्रेसने त्यांचा विचार न करता तरुण गोगोई यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर 2014 मध्ये सरमा यांनी गोगोई मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2016 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचा प्रचार केला. सत्तेवर आल्यानंतर सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2021 मध्ये पक्षाने सरमा यांना मेहनतीचे फळ देत मुख्यमंत्री केले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube