भाजपला प्रफुल्ल पटेल आवडते, नवाब मलिक नावडते का?
विशेष प्रतिनिधी ( प्रफुल्ल साळुंखे)
मुंबई : ईडीच्या कारागृहातून नवाब मलिक (Nawab Malik) जामिनावर बाहेर पडले. गेल्या दोन महिन्यात ते कुठेही गेले नाही. केवळ शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेतेच नव्हे तर अजित पवार गटाचे देखील सर्व नेतेही मलिकांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. मलिक हे आपल्याच गटात आहेत, असा दावाही दोन्ही गटांनी केला. पण मलिक यांनी यावर कधीही भाष्य केलं नाही. दरम्यान, आज नवाब मलिक थेट नागपूर अधिवेशनात गेले. त्या वेळी विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ते सभागृहात सत्तारूढ पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. या स्वागतावर उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली.
सुरुची अडारकरने बांधली पियुष रानडेसोबत लग्नगाठ, पाहा फोटो
फडणवीस यांनी केवळ नाराजी व्यक्त केली. तर त्यासंदर्भात त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं. हे पत्र समाजमाध्यमांवर देखील प्रसिद्ध केलं. खरंतर नाराजी ही अजित पवार यांच्या समोर व्यक्त करता आली असती, त्याला पत्राचे स्वरूप का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
खरंतर नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीचे वितुष्ट आहे. थेट कौटुंबिक हल्ले करण्यापर्यंत हे वितुष्ट गेल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिक यांनी केलेले आरोप आणि त्यावर मलिक यांची थेट ईडीच्या कारागृहात रवानगी, हे याच वितुष्टातून आल्याची देखील चर्चा आहे. एवढं सगळं होऊनही नवाब मलिक थेट सत्तारूढ बाकावर येऊन बसतात ही मोठी बाब आहे.
Madarsa Board : योगी आदित्यनाथ यांच्या रडारवर मदरासे! शंभर कोटी विदेशातून आले ? चौकशीसाठी एसआयटी
तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीच्या वेळी प्रफुल पटेल , अजित पवार, सुनील तटकरे, अनिल देशमुख, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारखे नवाब मलिक यांच्यावर देखील ईडीने आरोप केले होते. भुजबळ, देशमुख , मलिक हे कारागृहात जाऊन आले. अजित पवार गट थेट भाजप बरोबर सत्तेत गेला. त्यावेळी “ईडी पिडी टळो आपलं राज्य येवो” ही भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची नव्हती. तर अजित पवार गट सत्तेत सहभागी व्हावा, यासाठी भाजपही आग्रही होती. ज्यांच्यावर भाजपने आरोप केले, जेलमध्ये टाकलं तेच अचानक भाजपच्या नेत्यांच्या शेजारी बसून “(राज्य)” हिताचे निर्णय घेऊ लागले. त्यावेळी जनता हे सर्व उघड डोळ्यांनी पाहत होती. आजही पहाते आहे.
अजित पवार यांना सत्तेत घेऊन भाजपचा मोठा मतदार वर्ग नाराज झाला आहे. त्यात आता ज्या नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले, तेच मलिक आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत बसल्याने जनतेला काय उत्तर द्यावे. हा भाजप समोर पेच निर्माण झाला आहे. त्यात नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नवाब मलिक सत्तेत बसल्याने विरोधकांच्या हातात आयत कोलीत मिळालं आहे. अशा परिस्थितीत भाजपला यातून मार्ग काढायचा आहे का?
सर्वात महत्वाचं, म्हणजे छत्तीसगड , राजस्थान आणि मध्यप्रदेशात झालेल्या निवडणुकीत मोठा मुद्दा धार्मिक ध्रुवीकरण हा ठरला आहे. हिंदूंची एकगठ्ठ मतांमुळे भाजपला मोठ यश मिळालं, हे कुणीही नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीत धार्मिक ध्रूवीकरणात आगामी निवडणुकात आता मलिक अडचणीचे तर ठरणार नाहीत ना? याचा विचार भाजपला करावाच लागेल. त्यातून हे पत्र पुढे आले का? आधीच अजित पवार गटामुळे नाराज भाजप मतदार आणि कार्यकर्त्यांना मलिकांच्या रूपाने संदेश तर नाही ना? आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेतलं पण मलिकाना नाकारालं. हा संदेश ही भाजप आपल्या नाराज मतदारांना देतेय का? हा देखील मुद्दा उपस्थित होतो आहे.
आज नवाब मलिक नकोस झाले. त्याच नवाब मलिकाना जेलमधून बाहेर पडल्यावर प्रफुल्ल पटेल , सुनील तटकरे धनंजय मुंडे भेटायला गेले. मलिक आमच्या राष्ट्रवादीत (अजित पवार गटात) आहेत, हे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच वेळी भाजपने ही भूमिका स्पष्ट करायला हवी होती. नवाब मलिकाना पक्षात घेऊ नका. पण तसे झाले नाही. जसे नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत. तसेच काहीसे आरोप भाजपने प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील केले आहेत.
मुंबई बॉम्ब खटल्यातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या इकबाल मिरची याकडून प्रफुल्ल पटेल यांनी मालमत्ता घेतल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केले ना ? एवढचं काय तर प्रफुल्ल पटेल यांनी कुठल्या इमारतीमुळे ईडी लागली, हे देखील पुस्तकात लिहा अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. ते प्रफुल पटेल भाजपला प्रिय आहेत का? . आणि नवाब मलिक अप्रिय का झाले? भाजप देशद्रोहाची व्याख्या धर्मावरून ठरवते का ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
दरम्यान, फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर आता अजित पवार गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.