शिंदे गटात खदखद मंत्रीवर्गाचा दबाव वाढला?, भाजपा-शिवसेना युतीत ‘नवा तणाव’

अनेक जिल्ह्यांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भाजपाकडून फोडाफोड केल्याच्या तक्रारी वाढल्याने मंत्रीवर्ग संतापलेला आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 18T154307.288

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या गलियार्‍यात हलचल निर्माण झाली आहे. (Shivsena) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे. भाजपाशी असलेली युती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा पातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये ‘अज्ञात हातांनी’ हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप शिंदे गटातील मंत्रीच करत असल्याचे समजते.

ठाण्यातील कल्याण-डोंबिवलीसह अनेक जिल्ह्यांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भाजपाकडून फोडाफोड केल्याच्या तक्रारी वाढल्याने मंत्रीवर्ग संतापलेला आहे. प्री-कॅबिनेट बैठकीत शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर थेट नाराजी नोंदवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युतीत भाजप ‘धर्म पालन’ करत नसल्याचा आणि पक्षसंघटनेला तोटा पोहोचवत असल्याचा ठपका मंत्रीमंडळातील काही सदस्यांनीच ठेवला. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक मंत्री कॅबिनेट बैठकीला जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचंही सूत्रांचं म्हणणं. राजकीय संकेत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या पावलामुळे राज्यातील सत्तासमीकरणांवर नवीन प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

अजितदादांना धक्का; कोकाटेंचे समर्थक शिंदेंच्या शिवसेनेत, नगराध्यक्षपदासाठी नावंही घोषित

गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांत वाढलेले तिढे, उच्च पातळीपर्यंत पोहोचलेल्या तक्रारी आणि मंत्र्यांचा वाढता दबाव यामुळे सरकारच्या स्थिरतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. भाजप-शिवसेना (शिंदे) युतीत तणावाच्या रेषा आणखी गडद होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या परिस्थितीत काय भूमिका घेणार, मंत्रीवर्गाला समजावून अंतर्गत कलह आटोक्यात आणणार की भाजप नेतृत्वाशी थेट चर्चा करून परिस्थिती साफ करण्याचा प्रयत्न करणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा समोर येत आहे यामध्ये त्यांनी थेट भाजपामध्ये दिला जाणारा पक्षप्रवेश बद्दल तक्रार करत आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यावर मुख्यमंत्री फडणीस यांनी शिंदे यांच्या मंत्र्यांची बाजू ऐकून घेतले असून दोघांनीही पथ्य पाळावे आशा प्रकारे सुनावले असल्याचे समोर येत आहे. राज्यातील आगामी स्थानिक निवडणुका, विधानसभा समीकरणं आणि दोन्ही पक्षांतील विश्वासाचं वातावरण या तिन्ही पातळ्यांवर या घडामोडींचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो.

follow us