माझ्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका, सीआर पाटलांच्या मुलीचा खुलासा

माझ्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका, सीआर पाटलांच्या मुलीचा खुलासा

जळगाव : ‘माझ्या पॅनलच्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका. गिरीश महाजन व गुलाबराव पाटलांनी कधीही माझ्या विरोधात कारस्थान केलेले नाही. महाजन यांनी मला वडिलांसारखे मार्गदर्शन केले. या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. अगदी पॅनल पडल्यावर लागलीच त्यांचा फोन आला. त्यामुळे कुणीही सी.आर. पाटील व गिरीश महाजन यांच्यात माझ्या पराभवाच्या आडून राजकीय गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नये.’ असा खुलासा सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांनी केला आहे.

हा खुलासा करण्यामागील कारण म्हणजे मोहाडी ता. जामनेर जि. जळगाव या गावामध्ये सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल निवडणुकित पराभुत झाले. त्यानंतर एकीकडे सी. आर. पाटील गुजरात निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले मात्र दुसरीकडे त्यांच्या लेकीचा गावच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.

त्यानंतर भाविनी यांच्या पराभवामागे यात गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांचा हात असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र हा खुलासा करताना भाविनी यांनी ,’कुणीही मा. सी.आर. पाटील साहेब व मा. गिरीश भाऊ महाजन यांच्यात माझ्या पराभवाच्या आडून राजकीय गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नये. निवडणुकीच्या पराभवामुळे बेबनाव होईल असे वातावरण तयार करू नये.मा. गिरीश भाऊ महाजन व मा. गुलाबराव पाटील साहेब यांच्यात आमच्यात आजही स्नेहाचे वातावरण आहे.’ असे सांगितले आहे.

‘गावातीलच राजकीय सत्तेसाठी हपापलेल्या काही माणसांकडून चुकीचा प्रोपौगंडा सेट केला गेला. लोकांवर दबाव आणून माझ्या विरोधात प्रचाराची मोहीम राबवली गेली. त्यामुळे गावात आमच्या पॅनलचा पराभव झाला असला तरी मी आणि माझे २ सहकारी सदस्य म्हणून ग्रामपंचायत वर पुन्हा निवडून आलो. आमच्या पॅनलचा पराभव झाला. यात मा. गिरीश भाऊ महाजन व मा. गुलाबराव पाटील यांचा काहीही संबंध नाही, हेच या निमित्ताने स्पष्ट करू इच्छिते.’ असे स्पष्टीकरण भाविनी पाटलांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube