Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच ‘ते’ ट्विट फडणवीसांच्या स्क्रिप्ट राइटरने लिहलेलं, शाब्दिक कोट्यापेक्षा प्रकल्प का गेला ते सांगा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे ट्विट नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट राइटरने लिहलेलं असेल यात मला कोणतीही शंका नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं होत, त्याला सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
शब्दांच्या कोट्या करत बोलणं हे फक्त पंतप्रधान मोदी यांनाच जमत की काय? असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे त्यांच्याही पेक्षा जास्त नाटकी पद्धतीने लिहीत आहेत. अशी टीका देखील अंधारे यांनी यावेळी केली. यावेळी अंधारे यांनी चपलाची जी कंपनी राज्यातून गेली. त्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, उदय सामंत यांची ट्विट देखील दाखवली.
एकनाथ शिंदेना मोठा धक्का; शिवसेनेची संपत्ती ठाकरेंकडेच राहणार
उद्धव ठाकरे यांनी फक्त एवढंच म्हटलं होत की जोडे बनवण्याची कंपनी तामिळनाडूमध्ये गेली. पण ज्यांना दिल्लीचे जोडे पुसायची सवय लागली आहे, ते या प्रकल्पाबद्दल बोलणार का? राज्यात येणारा २,३०० कोटी रुपयांचा प्रकल्प तामिळनाडूमध्ये का गेला? असा प्रश्न आहे. त्याची त्यांनी उत्तर द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
एकनाथ शिंदे यांचं ट्विट काय ?
काल उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं होत. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहलं होत की, “काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.”
भावी मुख्यमंत्री, उत्साही कार्यकर्ते, नेत्यांना गुदगुल्या
जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.