विश्व मराठी संमेलनासाठी खर्चात वाढ करणार : मुख्यमंत्री
मुंबई : विश्व मराठी संमेलन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले. जगभरातील मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले. पुढील वर्षी या संमेलनाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाईल. अशी ग्वाही या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांचे हे संमेलन आयोजित केल्याबद्दल आभार मानले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांचे कौतुक करताना मला जून महिन्यात त्यांचा फार उपयोग झाला असं वक्तव्य केले. तसेच हे मराठी विश्व संमेलन आणि गणेशोत्सव जगभरातील मराठी माणसांना जोडणारा धागा आहे. तसेच विचार मराठी संस्कृतीचा विचार जगाला कवेत घेत आला आहे. कारण संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागताना संपूर्ण विश्वासाठी मागितले. तर मराठी माणूस जगात कोठेही गेला तरी तो मराठी मातीशी जोडलेला असतो.
विश्व मराठी संमेलनासाठी खर्चात वाढ करण्याची सूचना केली आहे. तिजोरीची चावी अर्थमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे आपल्याला पैसे कमी पडणार नाही. विश्व मराठी संमेलनाच्या पाठीशी सरकार आहे. हा सरकार देणारं आहे. घेणारं नाही. तसेच मराठी भाषा ही मातीतून आली आहे. त्यामुळे जे मातीतून आलेलं असतं ते वैश्विक होत. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईत आजपासून तीन दिवसांचे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वरळी येथे हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात जगभरातील पाचशेहून अधिक तर विविध राज्यांतून बाराशेहून अधिक मराठी भाषिक उपस्थित राहणार असल्याचा मराठी भाषा विभागाचा अंदाज आहे. या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.