भ्रष्टाचाराची प्रकरणे फडणवीसांना लवंगी फटाके वाटतायत

भ्रष्टाचाराची प्रकरणे फडणवीसांना लवंगी फटाके वाटतायत

नागपूर : विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेकवेळा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. त्यांनी विधानसभेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मात्र, सत्तेत बसल्यावर विरोधकांनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत. एवढे देवेंद्र फडणवीस कसे बदलले अशा शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, आम्ही नागपुरात बॉम्ब फोडू असे म्हणालो होतो. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले की वाती तयार आहेत. अजून अधिवेशन संपलेलं नाही. मुख्य म्हणजे आमच्यासाठी सीमा प्रश्न महत्वाचा आहे. सीमाप्रश्नी सरकारनं केलेला ठराव हा बुळचट असल्याचे राऊत म्हणाले.

त्या ठरावात सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करावा याबाबतचा उल्लेखही नाही. त्यामुळं हा ठराव नसून बेडकांचा डराव असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, आमचा लवंगी फटाका आहे का बॉम्ब याचा निर्णय लागेल, असा इशाराही राऊतांनी दिला.

सत्तारांवर टीका…
अब्दुल सत्तारांच्या भ्रष्टाचाराचा विषय हा काय लंवगी फटाका आहे का? सरकारी जमीन रेवड्या वाटाव्या तशी वाटली आहे. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कृषी महोत्सवासाठी काही कोटींची ठेकेदारी दिली, हा काय लवंगी फटाका आहे का? असे सवाल राऊतांनी उपस्थित केले.

विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचं काम करत आहेत. विरोधकांना बोलून दिल जात नाही. इतके पक्षपाती अध्यक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाल्याचं आम्ही पाहिलं नसल्याचे राऊत म्हणाले. आता फक्त विधानसभा अध्यक्षांनी खुर्चीवरुन उठूव वेलमध्ये येऊन भाजपच्या घोषणा देणंच बाकी असल्याचं राऊत म्हणाले. अशा स्थितीत बॉम्ब जरी टाकले तरी काही होणार नाही.

भाजपाला भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन फार काळ राज्य करता येणार नाही. दरम्यान गेल्या 3 दिवसात जी भ्रष्टाचाराची दोन प्रकरण बाहेर काढली त्या काय लवंग्या फटाक्या आहेत का? असा सवाल राऊतांनी केला. यावेळी 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना दिल्याचे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील नैतिक पातळी राखली पाहिजे. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube