शेटजी-भटजींचा भाजप गोपीनाथ मुंडेंनी बहुजनांचा केला…

  • Written By: Published:
शेटजी-भटजींचा भाजप गोपीनाथ मुंडेंनी बहुजनांचा केला…

(Gopinath Munde birth anniversary) महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण कार्यकर्त्याच्या देवघरात ज्यांच्या प्रतिमा आहेत, अशा नेत्यांची संख्या कमी आहे. यातील एक नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. कार्यकर्त्यांनी आपल्या देवघरात, देव्हाऱ्यात मुंडे यांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत. मुंडे यांच्या मृत्यूला नऊ वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्या प्रतिचा आदर कमी झालेला नाही. मुंडे यांची आज जयंती. ते आज हयात असते तर नक्कीच कोणत्या तरी मोठ्या पदावर असते. राज्याचे मुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री, अशा ठिकाणी मुंडे रुबाबदारपणे वावरले असते. भारदस्त शरीरयष्टी,  काळ्या रंगाचे जाकीट, उडणारे केस, हजरजबाबी भाषण त्याहून महत्वाचे कार्यकर्त्यावर असलेले जबरदस्त प्रेम. या प्रेमातून मग जाहीर कार्यक्रमांना होणारा उशीर. अशा साऱ्या व्यक्तिमत्वांचे मुंडे हे धनी होते.

मुंडे हे फक्त साडेचार वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेवर होते. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर तीन दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. इतर सर्व काळ विरोधाचा आणि संघर्षाचा. विरोधी नेत्याला फारसे जनसमर्थन लाभत नाही, हे म्हणणे मुंडेंनी सर्वथा खोटे ठरवले.

माधव नावाचे सूत्र

आत्ताचा भाजप आणि आधीचा जनसंघ याला महाराष्ट्रात १९९० पर्यंत फारसे जनसमर्थन नव्हते. राज्यात काॅंग्रेस ही मोठी शक्ती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एखाद्या शत्रूप्रमाणे वागवावे, असा तो काळ होता. परिणामी शेटजी आणि भटजी यांचा पक्ष म्हणूनच तो ओळखला जात होता. त्यामुळे पक्षाची वाढ होत नव्हती. त्या वेळी माधवनावाचे सूत्र भाजपने ठरवले होते. म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी असा जातसमूह एकत्र करून काॅंग्रेसच्या मराठा वर्चस्वाला आव्हान देण्याचा तो प्रयोग होता. या प्रयोगात मग ना. स. फरांदे, अण्णासाहेब डांगे आणि गोपीनाथ मुंडे हे नेते अग्रभागी होते. यातील गाजले ते गोपीनाथराव.

गोपीनाथरावांनी ओबीसी वर्गाला आवाज दिलाच पण ते त्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. सकल समाजाचा नेता होण्यासाठी त्यांनी कष्ट उपसले. त्यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला. त्यामुळे त्यांची संघर्षशील नेता अशी प्रतिमा झाली. त्यांची शरद पवार यांच्या विरोधातील १९९४ ची संघर्ष यात्रा फारच गाजली. त्या यात्रेमुळे ते राज्यभर पोहोचले. राज्यातील पहिल्या पाच नेत्यांत त्यांना स्थान प्राप्त झाले. पुढे १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यानंतर गोपीनाथराव हे उपमुख्यमंत्री झाले. सदैव कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारे गोपीनाथराव हे प्रशासनावर पण पकड असलेले नेते होते. पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी अनेक दिग्गज काॅंग्रेस नेते भाजपमध्ये घेतले. त्यात मोहिते पाटील घराण्यातील सदस्य असोत की उदयनराजे भोसले असोत. बीडमधील अनेक काॅंग्रेस नेते त्यांनी भाजपमध्ये सहभागी केले. त्यामुळे काॅंग्रेसचा पाया डळमळीत होण्यास तेथून सुरवात झाली.

ओबीसी जनगणनेची मागणी

देशभरात सध्या ओबीसी जनगणनेची मागणी होत आहे. पण सर्वात प्रथम यासाठी प्रयत्न करणारे गोपीनाथ मुंडे हेच होते. काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात राजू शेट्टी, महादेव जानकर यांना सोबत घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढण्यास उपयोग झाला. मुंडे हे १९९५ ते २०१४ या काळात महाराष्ट्रात भाजपचे अनभिषिक्त नेते होते. त्यांच्याच काळात पक्षात संघर्षापासून सत्तेपर्यंतचा प्रवास केला. पक्षाची एकहाती सत्ता आली तेव्हा मात्र ती पाहण्यासाठी मुंडे नव्हते. दिल्लीतील अपघातात त्यांचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या भव्य स्वागताची तयारी बीडमध्ये झाली होती. त्या सत्कारासाठीच ते दिल्ली विमानतळावर निघाले होते. पण नियतीने घात केला. भाजपचा चेहरा आणि अनेक कार्यकर्त्यांचा आधार असलेले गोपीनाथराव अचानक मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृत्युमळे राज्यातील अनेक समीकरणे बदलली. पण बदलला नाही तो गोपीनाथराव यांच्याबद्दलचा आदरभाव. अनेकांच्या मनात या संघर्षनेत्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube