शिवसेनेच्या आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार; संजय शिरसाटांचा इशारा
मुंबई : ठाकरे गटाच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीपचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमचे प्रतोद जो निर्णय घेतील तो ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक राहणारच आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. शिरसाट यांच्या या इशाऱ्यामुळे ठाकरे गटाचे आमदार व्हीप पाळणार का? व्हीप नाही पाळल्यास ठाकरे गटाचे 15 आमदार अपात्र ठरणार का? असे सवालही या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
शिवसेनेच्या 56 आमदारांनी अधिवेशनाला उपस्थिती असावी, प्रतोदांच्या सूचनेचे शिवसेनेचे सर्व आमदारांनी पालन करावे, 56 आमदारांना व्हीप लागू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्ष निधीसाठी आमची लढाई नाही, तर शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर असून त्यावर आम्ही हक्क सांगणार नाही, असे ही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
शिरसाट म्हणाले…
शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ही लढाई काही पार्टी फंड किंवा शिवसेना भवन मिळविण्यासाठी नव्हते. पक्षाचे चिन्ह आणि नाव महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही पक्षकार्यालयातील बैठक घेतली आहे. तर शिवसेना भवनवर आम्ही हक्क सांगणार नाही असे आम्ही आधीच जाहीर केले होते. कुणाला ती संपत्ती वाटत असली तरी ते आमच्यासाठी मंदिर आहे. तिथून आम्ही जेव्हाही जाऊ तेव्हा त्यास नमन करू असे संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
शिरसाट म्हणाले की, ज्यांना पैशाचा लोभ आहे त्यांनी ते करावे, त्यांच्याशी आमचे ते देणेघेणे नाही. एकीकडे शिवसैनिकांना पाळीव कुत्रा जो संबोधतो त्यांचे ते काम आहे असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या शाखेच्या जागा काही कुणी विकत घेतल्या नाही, ज्या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या संपत्ती आहे ती त्यांचीच राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. तसेच निवडणूक आयोग आणि शिंदे गटात न्याय विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींची डील झाली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत पागल आदमी है. त्यांच्या बाबत वारंवार विचारू नका. आठ दिवस थांबा संजय राऊत यांना उत्तर देऊ. कुत्रं पिसाळल्यावर त्याला काय चावायचं असतं का? त्याला कोणतं तरी औषध दिलं जातं. थोडं थांबा. राऊतांवर बोलून आम्ही चिखल उडवून घेणार नाही, असं ते म्हणाले.